श्री उपासनी बाबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विवेक दिगंबर वैद्य

महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या ‘उपासनी बाबा’ या धाडसी सत्पुरुषाची कहाणी.

काशीनाथ आणि दुर्गाबाई विपन्नावस्थेशी सामना करीत ओंकारेश्वर येथे आले. तेथील रम्य वातावरणात काशीनाथचे मन रमले. तिथे सातत्याने त्याच्या मनात अनुष्ठानादी साधना करण्याचे विचार येऊ लागले. ओंकारेश्वर परिसरातील काही दिवसांच्या वास्तव्यानंतर मात्र काशीनाथचा विचार निर्धारामध्ये परावर्तित झाला आणि तो फलाहार तसेच निंबाच्या पानांवर गुजराण करू लागला. या कालावधीत त्याला दुर्गाबाईंची अपार साथ मिळाली. अवतीभवतीच्या ग्रामस्थांना काशीनाथविषयी अपार कुतूहल वाटू लागले. अशातच अडीच वर्षे गेली.

एकदा काशीनाथ नित्यनेमानुसार साधनामग्न असताना त्याची श्वासोच्छ्वास क्रिया बंद पडती झाली. पतीची ही अवस्था पाहून दुर्गाबाई घाबरल्या. काही लौकिक उपाय करून त्यांनी पतीला मूळ अवस्थेत आणले, मात्र हा प्रकार अधूनमधून घडतच राहिला. दरम्यान, एकदा काशीनाथची भेट सिद्ध सत्पुरुष श्री नारायण महाराज (बेट केडगाव) यांच्याशी झाली. महाराजांनी त्यांच्या गळ्यातील पुष्पहार काशीनाथच्या गळ्यात घातला आणि जणू त्याच्यामधील सुप्तावस्थेतील संतत्व जागृत केले.

दरम्यान, काशीनाथास श्वासोच्छ्वासाचा त्रास सातत्याने होऊ लागला. बरेच इलाज झाले, मात्र गुण आला नाही. काशीनाथ उपचाराच्या हेतूने नगर येथे आला. नगर जिल्ह्यातील राहुरी येथे राहणारे योग शिक्षक, साधक कुलकर्णी महाराज यांनी ‘‘हा योगशास्त्रातील अडथळा नसून पारमार्थिक पेच आहे आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी शिर्डी येथे श्री साईबाबांकडे जावे लागेल’’ असा स्पष्ट सल्ला दिला. मात्र, साईबाबा हे मुस्लिम संत आहेत हे कारण पुढे करीत काशीनाथने हा सल्ला नाकारला आणि श्री नारायण महाराजांच्या दर्शनासाठी तो निघाला. बरीच भटकंती अन् पायपीट केल्यानंतर त्याला मुंबई मुक्कामी आलेल्या श्री नारायण महाराजांचे दर्शन घडले. तेव्हा महाराजांनी काशीनाथास आग्रहाने विडा खाऊ घातला आणि त्याचे रंगलेले तोंड पाहून ‘‘तुमचे चित्त शुद्ध होऊन ते आता पूर्णपणे रंगले’’ असे सूचक भाष्य केले. पुढे राहुरी येथे परतलेल्या काशीनाथचे मन वळवून कुलकर्णी महाराजांनी त्याला शिर्डी येथे जाण्यास राजी केले.

शिर्डी येथे गेलेल्या काशीनाथाची व्याधी श्री साईबाबांच्या एका दृष्टिक्षेपात दूर झाली असली तरीही श्री साईंनी अनेकविध लीला करून काशीनाथला शिर्डीमध्ये जखडून ठेवले. तब्बल चार वर्षांच्या कालावधीत काशीनाथच्या मानवी देहातील षड् विकार संपूर्णतः जाळले आणि त्याच्या अपूर्णावस्थेतील साधनेला पूर्णत्व प्राप्त करविले. आत्मसाक्षात्कार घडताच त्याची ‘उपासनी महाराज’ अशी नवी ओळख निर्माण झाली. दरम्यान, दुर्गाबाईंचे निधन झाल्यामुळे संसाराचा उरलासुरला पाश नाहीसा झाला आणि ‘उपासनी महाराज’ बंधमुक्त झाले.

साईंसारखा सद्गुरू लाभल्याने उपासनी बाबा साधनमार्गाच्या पायऱ्या विलक्षण चपळाईने चढते झाले. मात्र खंडोबाच्या देवळात वस्ती करून राहिलेल्या उपासनी बाबांना श्री साईंच्या अवतीभवती असणाऱ्या मंडळींनी विविध प्रकारे त्रास दिला. कानामागून येत तिखट झालेले उपासनी बाबा सर्वांच्या नजरेला खटकू लागले. देहभान, तहानभूक आणि लौकिक जगाचा पूर्णतः विसर पडलेल्या, गोणपाट हेच ‘वस्त्र’ धारण करणाऱ्या उपासनी बाबांना श्री साईबाबांनी परिपूर्णता बहाल केली. स्वतःमधील सत्त्व आणि तत्त्व उपासनी बाबांच्या सुपूर्द केले. त्यांच्या पश्चात आपल्या अवतारकार्याची झूल उपासनी बाबांच्या खांद्यावर चढवण्याचे स्वप्न वारंवार बोलून दाखवले आणि इतके करून साईमाऊली थांबली नाही तर एकदा द्वारकामाईतील भर दरबारात, ‘‘अरे, त्याच्यासारखा आहेच कोण? सगळे एकीकडे आणि तो एकीकडे! तो माझा आहे. मी त्याला सुवर्णपट दिला आहे’’ असे म्हणत उपासनी बाबांविषयी गौरवोद्गार काढले.

मात्र, श्री साईनाथांच्या समर्थनाला उघड आव्हान देण्याची हिंमत नसलेल्या मंडळींनी उपासनी बाबांचे जगणे मुश्कील केले. अखेरीस उपासनी बाबांनी कंटाळून त्यांचा मुक्काम शिर्डीपासून काही अंतरावर असलेल्या साकुरी येथे हलवला. श्री साईंच्या छत्रछायेतून बाहेर पडलेल्या उपासनी बाबांचा जणू कायापालट झाला. पूर्वी ब्राह्मणांची घरे सोडून अन्यत्र माधुकरी न मागणारे आणि श्री साईबाबा मुस्लिम साधू आहेत असे सांगून त्यांची भेट टाळणारे, धर्माचे कठोर अनुशासक असणारे उपासनी बाबा धर्माच्या अनिष्ट रूढींविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. उपासनी बाबांनी धर्मामध्ये आधुनिकता आणण्यासाठी बंडखोरी केली आणि धर्माधिष्ठत अनुचित तत्त्वांना तिलांजली दिली.

उपासनी बाबांनी परमार्थ प्रचारासाठी स्त्रीशक्तीचा उपयोग करण्याचे ठरविले. स्त्रियांनी वेदविद्या ग्रहण करावी, यज्ञकर्म करावे यासाठी चळवळ हाती घेतली आणि ‘कन्याकुमारी’ संघ निर्माण केला. त्यांनी २४ सुशिक्षित आणि घरंदाज मुलींना कन्याकुमारी व्रताची दीक्षा दिली. या मुलींना वेद, उपनिषद, यज्ञविधी तसेच अन्य धर्मकार्याचे रीतसर प्रशिक्षण दिले. त्यांचा हा पवित्रा त्या काळच्या काही मातब्बर आणि प्रतिष्ठित समाजधुरिणांना रुचला नाही. त्यांनी उपासनी महाराजांची यथेच्छ निंदानालस्ती केली. त्यांच्या चारित्र्याचे वाभाडे काढून त्यांची प्रतिमा हनन करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र कोणत्याही टीकेला, दबावाला न जुमानता उपासनी बाबांनी त्यांचे कार्य चालूच ठेवले. वेदमूर्ती सातवळेकर आदी विद्वान मंडळींनी उपासनी बाबांचे कौतुक केले. उपासनी बाबांवर दाखल झालेला बदनामीचा खटला श्री शंकर महाराज (धनकवडी) यांनी नगर येथील त्यांचे भक्त श्रोत्री वकील यांच्या सहाय्याने लढवला आणि जिंकूनही दाखवला.

‘श्रीउपासनी वाक्सुधा’ या प्रसिद्ध ग्रंथातून उपासनी बाबांची शिकवण, विचार, धर्माबद्दलची प्रखर जाणीव आणि वैचारिक प्रगल्भता जाणवते तसेच त्यांच्या अवतारकार्याचा खडतर प्रवास नाथमाधव लिखित ‘श्रीउपासनी चरित्रा’मध्ये वाचावयास मिळतो. उपासनी महाराजांनी ‘खरा’ धर्म लोकांसमोर आणला. मेहेरबाबांसारखा शिष्य सत्पुरुष निर्माण केला. साकुरी मठ तसेच ‘कन्याकुमारी’ सेवाव्रताचे उत्तरदायित्व ‘श्री गोदावरीमाते’च्या हवाली केले. श्री साईबाबांच्या अंतरंगातील या शिष्याने समाजातील खोटारडेपणाला कंटाळून स्वतःला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून घेतले, आणि २४ डिसेंबर १९४१ रोजी देह त्यागून या दांभिक जगरहाटीला अखेरचा निरोप दिला.

महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे धाडसी कार्य उपासनी महाराजांनी केले. शिष्याने गुरूंचे विचार समाजाभिमुख केले. उपासनी बाबा देहावर गोणपाट परिधान करीत असले तरीही त्या गोणपाटात नव्या विचारांचे सोने होते. ते सिद्ध करण्यास ‘साईबाबां’सारखा परीस लाभणे हे उपासनी बाबांचे भाग्य आणि मात्र त्यांचे विचार जाणण्याची कुवत आम्हा ‘दगडां’मध्ये नसणे हे आमचे दुर्भाग्य.

[email protected]