
>> स्पायडरमॅन
जगभरात ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. स्मार्टफोनपासून सुरू झालेले हे ‘स्मार्ट’ तंत्रज्ञान ‘स्मार्ट कार, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फ्रीज’पासून ते पार ‘स्मार्ट टूथ ब्रश’पर्यंत येऊन पोचलेले आहे. जगभरातील सर्व उद्योगधंदे ‘स्मार्ट’ होत असताना, कपडय़ांचे उत्पादक तरी मागे का राहतील? काही काळापासून कपडय़ांच्या निर्मितीला ‘स्मार्ट’ टच मिळाला असून, आता सहजपणे परवडू शकतील अशा किमतीत ‘स्मार्ट कपडे’ देखील निर्माण होऊ लागले आहेत.
अशाच एका अनोख्या ‘स्मार्ट टीशर्ट’ची निर्मीती सध्या जोरदार चर्चेत आहे. खास 6 ते 12 वर्षांच्या मुलांना शरीर रचनेचा अभ्यास करण्यासाठी हा ‘स्मार्ट टीशर्ट’ एखाद्या तरबेज शिक्षकाची भूमिका सहज पार पाडू शकणार आहे. या टीशर्टच्या बरोबरच येणाऱया एका मोफत मोबाइल ऑप्लिकेशनच्या मदतीने शरीरातील अंतर्गत भाग, जसे की, आतडे, शरीरातील हाडे, शरीरातील रक्तप्रवाह यांची कार्यप्रणाली सहजतेने अभ्यासता येणार आहे. याबरोबर या टीशर्टच्या मदतीने नाडीचे ठोके मोजणे, शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग तपासणी, हृदयाचे ठोके मोजणे, ब्लड प्रेशर, ईसीजी, स्ट्रेस लेवल तपासणे अशी अनेक बहुमोल कार्ये करता येणार आहेत.
हे ऑप्लिकेशन क्लाउड सर्व्हरला जोडलेले असल्याने आरोग्यासंदर्भात गोळा केलेला सर्व डाटा ते सतत अपडेट करत राहते. ‘ऑगमेंटेड रिएलिटी’ तंत्रज्ञानाद्वारे बनवलेला हा टीशर्ट म्हणजे एक चालती फिरती ‘टेस्ट लॅब’ आहे असे म्हणायला हरकत नाही. हा स्मार्ट टीशर्ट विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राच्या अभ्यासात मदत करणारा असल्याने, त्याला ‘थ्री डी बायोलॉजी टीचर’ असे देखील एक नाव देण्यात आलेले आहे. या टीशर्टची निर्मिती करणारी ‘क्युरिस्कोप’ ही क्राऊड फंडिंग स्टार्ट-अप कंपनी असून, या निर्मितीसाठी त्यांनी 2016 सालापासून प्रयत्न सुरू केले आहेत. या स्मार्ट टीशर्टचे मोबाइल ऍप सध्या ‘प्रोटोटाइप’ असून, लवकरच मेडीकल क्षेत्रामधून याची पूर्ण तपासणी होऊन मान्यता मिळण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर साधारण ऑगस्टच्या सुमाराला हा टी शर्ट बाजारात उपलब्ध होईल.





























































