
>> दुर्गेश आखाडे
कथा, कविता, ललित, गीतलेखन अशा साहित्याच्या सर्व प्रकारात वावर असणाऱ्या अष्टपैलू लेखिका स्मिता राजवाडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या 73 वर्षांच्या होत्या. संतसाहित्याच्या त्या अभ्यासिका होत्या. त्यांची सतराहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. स्मिता राजवाडे यांचा जन्म 30 जानेवारी 1948 रोजी झाला. त्यांनी हिंदी आणि मराठी या दोन्ही विषयांत प्रथम श्रेणीतून एम.ए. पदवी संपादित केली होती.
राष्ट्रभाषा पंडित, साहित्य विशारद या परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या होत्या. रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूल आणि फाटक हायस्कूल येथे त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले. हिंदी आणि मराठी भाषेतील साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर, कुसुमाग्रज, संत कबीर यांच्यावर त्यांनी विपुल लेखन केले. ‘रामचरितमानस’ या संपूर्ण काव्याचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. त्या श्रीकृष्णभक्त होत्या. त्यांनी श्रीकृष्णावर अनेक काव्ये लिहिली आहेत. त्यांनी उर्दू भाषा शिकून उर्दू साहित्याचा अभ्यास करत उर्दू काव्यरचनाही केल्या होत्या.
कादंबरी, कथा, ललित काव्यसंग्रह, अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य, नाटक अशी 17 पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये ‘अनुदिनी आणि सोनेरी क्षण’, ‘आकाशवेल’, ‘राजू हरवला, राजू सापडला’ हे कवितासंग्रह, ‘गुणगुणगाणी’, ‘गंमतगाणी’, ‘जादूची दुनिया’, ‘वाघोबाचं लगीन’, ‘सुवर्णकमळ आणि इतर कथा’ हे बालवाङ्मय प्रसिद्ध आहे. ‘गिरिधरनागर’, ‘दीपमाळ’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘जिप्सी’, ‘त्या दोघी’, ‘शेवटचे घरटे माझे’, ‘नरपशू’ या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर ‘फोडीले भांडार’ आणि ‘जगद्गुरू श्री वल्लभाचार्य पुष्टिमार्ग’ हे धार्मिक गंथही त्यांनी लिहिले आहेत.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कै. कुसूमताई अभ्यंकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ‘गुणगुणगाणी’ या बालसाहित्यसंग्रहाला पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. 1990 साली रत्नागिरीत झालेल्या 64व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रासाठी त्यांनी विविध कार्यक्रमांचे लेखन केले आहे. रत्नागिरीच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीतही त्यांचा मोलाचा वाटा होता.



























































