ठसा – एस. पी. बालसुब्रमण्यम

>>  प्रशांत गौतम

गेल्या सहा महिन्यांत कोरोना नावाच्या यमदूताने हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलावंतांचा बळी घेतला. केवळ कलावंतच बळी गेले नसून जगभरात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्यातीलच चटका लावणारे एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे झालेले निधन. चेन्नईत उपचार सुरू असताना हा ाप्रतिभावंत गायक आपल्या सुरेल आठवणी मागे ठेवून चिरंतनाच्या प्रवासाला निघून गेला. तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदीसह सोळा भाषांत त्यांनी तब्बल चाळीस हजारांवर गाणी गाऊन असंख्य कानसेन मंडळीचे कान तृप्त केले. काहीशा धीरगंभीर जादुई आवाजातून आलेल्या रोमँटिक गाण्यांनी तरुणाईवर गारूड घातले. ‘तेरे मेरे बीच मे कैसा है ये बंधन अंजाना…’ या ‘एक दुजे के लिए’ चित्रपटातील गाणे असो किंवा ‘मैने प्यार किया’मधील ‘दिल दिवाना बिन सजना के माने ना’ किंवा ‘साजन’मधील ‘बहोत प्यार करते है तुमसे सनम’ त्याचप्रमाणे ‘साथिया, तूने क्या किया’ अशी असंख्य गाणी एसपींनी गायली. हळुवार पण थेट काळजालाच हात घालण्याची त्यांची हातोटी विलक्षण भारावून टाकणारी होती. हिंदीत जसे किशोर कुमारचे स्थान होते तसे दक्षिणेत एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे स्थान होते. वास्तविक पाहता अभिजात संगीत शिक्षण घेण्याची संधी त्यांना लाभलीही नव्हती. पण पार्श्वगायनात भावदर्शन त्यांनी अचूक जाणले. याच बलस्थानावर एसपींनी वयाच्या विसाव्या वर्षापासून स्वरसाधना सुरू केली, जी पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर अचानक थांबली. 4 जून 1946 रोजी एस.पी. (श्रीपती पंडिताराध्युला) बालसुब्रमण्यम यांचा जन्म तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सी म्हणजे सध्याच्या तामीळनाडूतील कोनेटम्पेट या गावी झाला. अभियंता होण्याचे त्यांचे स्वप्न टायफॉइडच्या आजाराने पूर्ण होऊ शकले नाही. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी संगीत क्षेत्रात प्रवेश केला. मात्र अभिजात संगीताचे शिक्षण त्यांना घेता आले नाही. विविध छोटय़ा-मोठय़ा संगीत कार्यक्रमात ते गायन सादर करीत असत. तेलगू चित्रपटात पार्श्वगायक म्हणून त्यांना संधी मिळाली. नंतर कन्नड भाषेत अशी संधी लाभली. दाक्षिणात्य चित्रपटाचे गायक म्हणून त्यांना लोकप्रियता मिळू लागली. अभिनेता आणि गायक अशी त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली. 15 डिसेंबर 1966 रोजी त्यांनी ‘श्री श्री मर्यादा रामण्णा’ या तमिळ चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले, तर त्यानंतर तीन वर्षांनी पहिले तमीळ गाणे रेकॉर्डही केले. मात्र 1980 मध्ये आलेल्या ‘शंकरा भरणम’ या चित्रपटाने त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त करून दिली. ज्याचा सन्मान राष्ट्रीय पुरस्काराने झाला. दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन आणि एस. पी. बालसुब्रमण्यम या जोडीने साकारलेला लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘एक दूजे के लिये’ सांगता येईल. असेच सलमान खान याच्या बाबतीत म्हणता येईल. सलमानला बॉलीवूड कारकीर्दीच्या सुरुवातीस एसपीचा आवाज लाभला. ‘मैने प्यार किया’मधील सलमान युवा पिढीच्या गळय़ातील ताईतच होता. या चित्रपटातील अनेक गाणी सुपर डुपर हिट झाली. लता मंगेशकर आणि एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या सुमधुर आवाजातील ‘आते जाते, कबूतर जा जा’ ‘आजा शाम होने आई’, ‘मेरे रंग मे रंगनेवाली’ ही गाणी तुफान गाजली. या चित्रपटातील ‘दिल दिवाना’ आणि ‘हम आपके है कौन’मधील ‘दीदी तेरा देवर दिवाना’ या गाण्यांचा सन्मान फिल्मफेअर या महत्त्वाच्या पुरस्काराने झाला. सलमान खानची भूमिका असलेले चित्रपट ‘पत्थर के फूल’, ‘लव’, ‘साजन’, ‘अंदाज अपना अपना’ याही गाजलेल्या चित्रपटांना एसपीच्या पार्श्वगायनाचा धीरगंभीर आवाज लाभला होता. बारा तासांत एकवीस गाणी गाण्याचाही त्यांनी विक्रम केला. ज्याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. या प्रवासात अभिनेते कमल हसन, रजनीकांत, सलमान खान या नायकांचा गाता गळा अशी ओळख एसपींना लाभली. पन्नासेक वर्षांच्या प्रवासात एम. एस. विश्वनाथन, इलयाराजा, ए. आर. रहेमान, नदीम-श्रवण, जतीन-ललित यांच्यासारख्या संगीतकारांसोबतही त्यांनी काम केले. उत्कृष्ट अभिनेते, निर्माते अशी त्यांची ओळख होती. ‘हम से है मुकाबला’ या चित्रपटात अभिनेता प्रभुदेवाच्या भावाची भूमिका त्यांनी साकारली होती. तर ‘शुभ संकल्पम्’ या तमिळ चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला. हिंदुस्थानचे नागरी सन्मान पद्मश्री, पद्मविभूषण या सर्वोच्च सन्मानानेही त्यांचा गौरव झाला होता. दाक्षिणात्य चित्रपटांचे ते लोकप्रिय गायक तर होतेच, पण त्यांनी गायलेल्या असंख्य सुमधुर गाण्यांनी चार पिढय़ा समृद्ध झाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या