
>> शैलेंद्र सोनवणे
धुळे जिह्यातील कळगाव, तालुका साक्री येथील नितीन ठाकरे व पृथ्वीराज ठाकरे या भावंडांनी जिरायती शेतीची ओळख पुसून फलोत्पादनात त्यांनी ओळख निर्माण केली आहे. डाळिंब, शेवगा, सीताफळ यांसारख्या पिकांत गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम उत्पादन घेत उत्पन्नवाढ साधली आहे.
काळगाव (ता.साक्री,जि.धुळे) परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने प्रामुख्याने जिरायती पिके येथे घेतली जायची. त्यामुळे शेतकरी जयवंत सखाराम ठाकरे यांच्या वाटय़ाला मोठा संघर्ष होता. सिंचन व्यवस्था नसल्याने मका, कापूस, भुईमूग, बाजरी अशी खरीप पिके घेत. यातून मिळणारे उत्पन्न मर्यादित असल्याने गरिबीच्या झळा या कुटुंबाने सोसल्या. दरम्यान, 1994 कुटुंब विभक्त झाल्यानंतर अजूनच अडचणी वाढल्या. त्यामुळे भावंडाच्या विहिरीतून पाणी घेऊन थोडेफार उत्पन्न ते घ्यायचे. आर्थिक परिस्थिती नसल्याने थोरला मुलगा पृथ्वीराज याने सातवीलाच शिक्षण सोडले, तर धाकटा मुलगा नितीन बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर नाशिक जिह्यातील सिन्नर येथे डी.एडसाठी प्रवेश निश्चित झाला होता. मात्र अवघा दहा हजार खर्चही त्या वेळी पेलवणारा नव्हता. त्यामुळे नितीन यांचे पुढील शिक्षण थांबले. पुढे 10 हजार रुपये भांडवलातून 45 फूट विहीर खोदली. सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यानंतर रब्बी हंगामात मका, तूर अशी पिके घेण्यास सुरुवात झाली. पुढे पृथ्वीराज व नितीन यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारली. खर्च व उत्पादन, परिसरातील आदर्श शेतकऱयांच्या कामकाजाचा अभ्यास करून नितीन हे थोरले भाऊ पृथ्वीराज यांच्या सोबतीने नव्या दमाने काम करू लागले. त्यामुळेच गेल्या दोन दशकांत यशस्वीरीत्या उत्पादन वाढ करून दाखवण्यात त्यांना यश आले आहे.
2004 साली नितीन यांनी फलोत्पादन क्षेत्र निवडून डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला. त्यातूनच सुरुवातीला एक एकर क्षेत्रावर मृदुला वाणाच्या 400 रोपांची लागवड केली. प्रगतीशील शेतकरी कृषिभूषण संजय भामरे, राजेंद्र भामरे यांचे मार्गदर्शन लाभले. लागवडीनंतर 2006 साली पहिल्यांदा उत्पादन हाती आले. मात्र अनुभव कमी असल्याने अपेक्षित यश आले नाही. मात्र नितीन खचून न जाता सकारात्मक वृत्तीने पुढे जात राहिले.
डाळिंब पिकाने मोठा आधार दिला होता. मात्र मधल्या काळात रोग, गारपिटीमुळे डाळिंब काढणी अवस्थेपूर्वीच फळांची नासाडी होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र पुन्हा संकटाला तोंड देत धैर्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. 2010 साली नितीन यांनी पाच एकर क्षेत्रावर शेवगा लागवड केली होती. या पिकाचेही नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत वाटा शोधून नितीन यांनी उपलब्ध भांडवल व स्रोत ओळखून पुन्हा नव्याने पीक पद्धतीचा अभ्यास केला. उन्हाळ शेवगा बहार हा नवीन पर्याय प्रयोगातून पुढे आला. त्यातून बहार धरून 90 दिवसांनंतर गुणवत्तापूर्ण शेवगा बाजारात गेल्यानंतर मालाची मागणी वाढली आणि पुन्हा एकदा संकटातून संधी असा प्रसंग घडला. एका वेळी शेवगा लागवड करताना या पिकाची लागवड चांगली नाही अशी अंधश्रद्धा होती. मात्र नितीन यांच्या प्रयोगाने ती खोडून काढली. मर्यादित उत्पादन खर्च व उत्पन्नाची हमी देणारे पीक त्यांना गवसले.
डाळिंब शेतीकडे यशस्वी वाटचाल
2008, 2014 साली डाळिंब शेतीत दोनदा संकटांच्या मालिका आल्या. मात्र पुन्हा 2018 साली पाच एकर क्षेत्रावर भगवा वाणाच्या लागवडीचा निर्णय घेतला. प्रयोगशीलता, सूक्ष्म अभ्यासाच्या माध्यमातून 2021 साली उत्पादन हाती आले. डाळिंब उत्पादनात मृग, हस्त व आंबिया असे तीन बहार उत्पादन जातात. मात्र नितीन हे वर्षातून एकच आंबिया बहार उत्पादन घेतात. “या बहारमध्ये उत्पन्नाच्या अंगाने उन्हाळ्याच्या दिवसांत आव्हाने असतात. मात्र बाजारपेठेत मालाची उपलब्धता कमी असल्याने दराचा लाभ होतो. त्यामुळे आंबिया बहारच्या उत्पादनात नियोजन करत असतो. त्याचा परतावा चांगला मिळतो’’ असा अनुभव नितीन सांगतात.
कष्टातून निर्माण झाली ओळख
खासगी कर्ज घेऊन एक एकरवर 400 डाळिंबाच्या झाडांपासून झालेली सुरुवात व आज 14 एकरपर्यंत झालेला विस्तार हा प्रेरणादायी असाच आहे. आज 35 एकर क्षेत्रावर फलोत्पादन क्षेत्र आहे. “नोकरी करण्यापेक्षा आपण आठ तास जबाबदारीने 2 ते 3 एकर शेतात राबल्यास एका कंपनीप्रमाणे शेतमालाचे उत्पादन घेतल्यास व्यावसायिक असतो. गुणवत्ता असेल तर बाजारात स्थान मिळतेच’’ असे नितीन अभिमानाने सांगतात. मात्र “यामध्ये लाज नको, तर काम करण्याची वृत्ती हवी. तरच शेती शक्य आहे.’’ ‘डाळिंबामुळे सोन्याचे दिवस आले’ असाही संदेश ते नव्या पिढीला देतात.
‘कृषी विस्तारातून समृद्धी’ हे ठाकरे बंधुंनी साधले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘कृषिथॉन आदर्श डाळिंब पुरस्कार’, कृषी विभाग व धुळे कृषी महाविद्यालयाकडून ‘वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार’ ग्रामपंचायत कळगाव यांच्याकडून ‘सरपंच कृषी गौरव’, मराठा सेवा संघ (साक्री) यांच्याकडून ‘प्रेरणा पुरस्कार’ या पुरस्कारांनी दोघांना गौरवण्यात आले आहे.
बहुपीक पद्धतीमुळे उत्पन्नाची कमी जोखीम
गेल्या वीस वर्षांत फलोत्पादन क्षेत्रात काम करताना नैसर्गिक आपत्तीचा मोठा सामना करावा लागला. यातून धडा घेत शेती उत्पन्नातील जोखीम कमी करण्यासाठी बहुपीक पद्धतीचा अवलंब केला आहे. ज्यामध्ये सुरुवातीला डाळिंब, शेवगा, तर अलीकडे सीताफळ लागवड केली आहे. दोन्ही भावंडांनी पहिल्यापासून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला आहे. भांडवलाचा अंदाज घेऊन त्यानुसार पीक पद्धतीचा विस्तार हे त्यांच्या कामातील मुख्य सूत्र आहे. सुरुवातीला डाळिंब, शेवगा आणि त्यांनतर सीताफळ लागवड केल्याने बहुपीक पद्धतीतून उत्पन्नाची जोखीम कमी झाली आहे. आता पुन्हा नव्याने नऊ एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड करण्याचे नियोजन केले असून त्या सुरुवात झाली आहे. अनेक आव्हाने, संकटे त्यांनी झेलली. मात्र प्रयत्न सोडले नाहीत. “एकीने पुढे जायचे असल्यास जोडगोळीशिवाय शेती नाही आणि एकत्रित कुटुंबाशिवाय आर्थिक प्रगती नाही’’ असे नितीन सांगतात.