स्मरणातले स्वरतीर्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ गीतकार, संगीतकार आणि आधुनिक वाल्मीकी ही ओळख असणारे बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्याशी रसिकांचा अजोड, अवीट स्नेहबंध जोडला आहे. हा स्नेह, आपुलकी याचा अनुभव देणाऱया भेटीचं बीज कसं रुजलं हे सांगणारा ज्येष्ठ लेखक प्रवीण दवणे यांचा हा लेख बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त.

स्वरतीर्थ बाबूजींच्या आठवणी मी सांगणं, याला असलाच तर माझ्यापुरताच अर्थ आहे. पण विश्वाने घातलेली महापूजा आणि मनोभावे केलेला साष्टांग नमस्कार, यात लहानमोठं कसं करणार? नि ठरवणार तरी कोण? तीच विनम्रता, तोच शुद्ध भाव बाबूजींबद्दलच्या माझ्या या वैयक्तिक आठवणी उलगडताना आहे.

शिवाजी पार्कचा तिसरा रस्ता, त्या नवथर वयात अनेक कारणांसाठी मला ओढ लावीत असे. कॉलेजमध्ये शिकत असताना काही महिने मी प्रसिद्ध समीक्षक माधवराव मनोहर यांच्याकडे लेखनिक म्हणून जात असे. अशाच एका बैठकीत माधवराव म्हणाले, ‘समोर कोण रहातंय ते माहितेय का?’ मी अर्थातच ‘नाही’ म्हटलं; माधवराव म्हणाले, सुधीर फडके रहातात, ‘शंकर निवासा’त. माझं आश्चर्य विरतं न विरतं तेवढय़ात माधवराव म्हणाले, नि त्यांच्या अगदी समोर म्हणजे आमच्या जवळजवळ शेजारी यशवंत देव रहातात. दोन दिग्गज व्यक्ती जे अशी ‘आमने-सामने’ रहात असतील असं वाटलं नव्हतं. त्या क्षणापासून ‘शंकर निवास’ दुरून बघणं हा माझा आनंद झाला. त्या सुमारास बाबूजींच्या स्वरातून ‘गीत रामायण’ मी ऐकलं होतं. तो मंत्र भारला स्वर! ‘श्रीराम!’ असा केवळ उच्चार करताच निर्माण होणारी धीरगंभीर वातावरणनिर्मिती मी विद्यार्थी दशेत खूप दुरून, गर्दीतून अनुभवली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भक्कम उमदेपणा, चेहऱयावरचे संयत स्मीत आणि श्रोत्यांशी संवाद साधत गायनाची शैली यामुळे संमोहित होणाऱया असंख्य भक्तांपैकी मी एक सामान्य, पण सध्या भक्त होतो. ‘गीत रामायण’कार, कविश्रेष्ठ ग.दि. माडगूळकर आणि ते सादर करणारे सुधीर फडके ही माझ्या पिढीची चालती-बोलती देवालये होती. पैकी ग.दि.मां.ची भेट खूपच शाळकरी वयात झाली होती. गदिमा काळाच्या पडद्याआड अकालीच गेले; परंतु त्यांच्या शब्दांतील लक्ष्य जिवंत ठेवणारा, ‘श्वास’ देणारा थोर संगीतकार खूप जवळून पाहता आला. दुर्दैवाने त्यांच्याबरोबर गीतलेखन करण्याची संधी नियतीने दिली नाही. पण त्यांच्यासमोर बसून गीतलेखन करण्याची संधी पुढे मिळाली.

मनाचा हिय्या करून मी ‘शंकर निवास’च्या पायऱया चढल्या आणि ‘सुधीर फडके’ असे अगदी ठळकपणे मराठीतून लिहिलेल्या घराची बेल धाडसानेच दाबली. काय होईल ते होवो, मला ‘सुधीर फडकें’ना जवळून भेटायचे होते आणि नमस्कार करायचा होता. त्यांच्या स्वर व संगीतावर निस्सीम प्रेम करणारा एक रसिक ही एकमेव पात्रता माझ्याकडे होती. दरवाजा उघडला तो साक्षात बाबूजींनी! तेच उमदं – मंद स्मीत.

‘कोणाकडे? – माझ्याकडे की श्रीधरकडे?’

‘आपल्याचकडे-’

‘या।़।़’

मी माझ्या येण्याचा हेतू सांगितला. मग म्हटले, ‘हे सर्व पुरस्कार बघायचेत; बघू?’ माझा शाळकरी बाळबोध उत्साह त्यांना आवडत असावा. सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराची मानचिन्हे ओळीने मांडली होती. जगाच्या पाठीवर, सुवासिनी, अशी कितीतरी! मला केवळ मानचिन्हेच दिसत नव्हती तर त्यातून जणू त्या त्या चित्रपटाची गाणी ऐकू येत होती. या गीतांचा संगीतकार माझ्याशी गप्पा करीत होता; विचारपूस करीत होता. सुधीरजी अतीव मायेने बोलत होते. सुमतीबाईंनी आतिथ्य केले.

मनातल्या ओढीतच बहुधा नव्या भेटीची बीजं रुजत असावीत. आकाशवाणीतील ‘युवावाणी’त माधवराव कुलकर्णी तेव्हा अनेक प्रयोग करीत असत. नामवंतांच्या मुलाखतीचे एक सदरच त्यांनी सुरू केलं आणि विशेष आश्चर्य म्हणजे बाबूजींची मुलाखत मी घ्यावी असं ठरलं. आता संगीतातलं त्यांना मी काय विचारणार? ‘सा’ कुठला नि ‘रे’ कुठला याबाबत माझा सारा आनंदच होता. म्हणूनच निर्माता माधव कुलकर्णी यांनी माझ्याबरोबर संगीताची जाण व उत्तम गायिका असलेली अपर्णा देव यांनाही साथीला दिले. आजही आठवतं, माझ्या ऐन उमेदीतील आणि बाबूजींशी केलेल्या थेट संवादाची ही सुवर्णसंधी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खऱया अर्थाने ओळख करून देणारी होती. ‘गीत रामायणा’ला नुकतीच पंचवीस वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्ताने त्यांनी जागवलेल्या आठवणींनी वेळ अपुरा पडला होता. पहिलेच गीत प्रसारणाच्या आदल्या दिवशीच हरवल्याने उडालेली गडबड, गदिमांची सिद्धहस्त प्रतिभा; प्रसारणातच सुचलेली स्वररचना याबरोबरच गदिमांच्या शेवटच्या आजारात ‘आराम हराम है’ चित्रपटासाठी त्यांच्याकडून लिहून घेतलेली लावणी – ‘हात सोडा, जाऊद्या… सोडा…’ ही लावणी सुधीरजींनी खास लावणीतील हरकतींसह गाऊन दाखवली होती. ही मुलाखत प्रसारीत होताच श्रोत्यांनी केलेला कौतुकाचा वर्षाव वाटचालीतील प्रसादक्षण होता.

आता ‘सुधीर फडके’ या एका ज्येष्ठ, शालीन उत्तुंगतेशी मी नकळत जोडला जाऊ लागलो होतो. दरम्यान, सुधीर फडके नावाचा स्वर संगीताच्या डेरेदार कल्पवृक्षाच्या नंदनवनात आणखी एक स्वरतरू बहरू लागला होता अर्थात श्रीधर फडके! आजही लख्ख आठवतं, श्रीधर फडके यांनी दूरदर्शनसाठी दीपोत्सवी गीतलेखनासाठी मला गीतकार म्हणून बोलावले होते. श्रीधरजींबरोबर गीत लिहिण्याच्या संधीच्या आनंदाला आणखी एक परमानंद बिलगलेला होता; तो म्हणजे हे गीत जन्माला येत असताना साक्षात स्वरतीर्थ बाबूजी साक्षीला होते. श्रीधरजी स्वररचनेवर माझ्याकडून गाणे लिहून घेत होते; गीतरचना दीर्घकाळ चालली होती. गाण्याची ओळ, शब्दरचना म्हणून चांगली उतरली की सुधीरजी डोळय़ांनीच ‘छान’ असा संकेत देऊन पसंतीदर्शक हात करीत. आपण नवे गाणे लिहिताना स्वतः बाबूजी एखाद्या मूर्तिमंत आशीर्वादाप्रमाणे आहेत, ही जाणीव एक नवा उमेदीचा कवी म्हणून मला भारावून टाकणारी असे. अतिशय मृदू व मीतभाषी असे बाबूजी माझ्या अनेक गीतनिर्मितीसाठी मला प्रोत्साहन देत राहिले.

स्वरतीर्थ बाबूजींचे थोरपण मला आणखी एका वेगळय़ाच कारणाने अनुभवायला मिळाले. त्या काळात मी डोंबिवलीला चाळीत राहात असे. आजच्यासारख्या सोयी नव्हत्या. गीतरचनेची कामे ओघ लागल्यासारखी हाती येत होती, पण डोंबिवली ते दादर-मुंबई गाठणे हे त्रेधा करणारे होते. मी शासकीय कोटय़ासाठी अर्ज केला. कलावंतांना अग्रक्रमाने, तुलनेने स्वस्त जागा ठाणे-मुंबईत मिळण्याची ही योजना होती. त्या अर्जात एक अट होती. संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ व नामवंत व्यक्तींची शिफारस असणे आवश्यक होते. माझी ही अडचण मी विनम्रपणे बाबूजींना सांगितली. आश्चर्य म्हणजे क्षणाचाही विचार न करता बाबूजींनी पाच-दहा मिनिटांत शिफारसपत्र मला दिलेही. मन भरून आले; योजनेतील जागा मिळेल तेव्हा मिळेल; पण इतक्या थोर महानुभवाच्या मनात आपल्यासाठी इतकी विश्वासाची ‘जागा’ आहे हे कळल्याने भरून पावलो.

बाबूजींची राष्ट्रभक्ती, गोवा मुक्ती संग्रामातील त्यांचा सहभाग त्या गोष्टी तर जगाला परिचीत आहेत. परंतु ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या निर्मितीचा त्यांनी घेतलेला ध्यास मी जवळून अनुभवला. प्रकृतीने साथ देणे कमी केले; तरी त्यावर मात करून बाबूजी चित्रपटासाठी निधी संकलन करीत राहिले. गावोगाव कार्यक्रम करून स्वातंत्र्यवीरांच्या अनुयायांना आवाहन करीत राहिले. काही कार्यक्रम मी स्वतः ऐकले. गळय़ाचा त्रास होत असताना, दमछाक होतानाही – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ या ओळी गाताना बाबूजी आर्त होत असत; कवितेतली मातृ भूची ओढ माय-लेकराचे असावेत असे अनुबंध बाबूजींच्या स्वररचनेतून प्रगत होत असत. मैफल ओसरताना श्रोत्यांच्या डोळय़ांत पाणी आणि हृदयात राष्ट्रभक्तीचा पलिता धगधगत असे.

त्यांची मी ऐकलेली शेवटची मैफल ‘चतुरंग’ संस्थेने आयोजित केली होती. भावगीतरजनी होती. त्याही वेळी ते खूपच विकल वाटले. परंतु ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट हा एक ध्यास हाच त्यांचा प्राणवायू होता. खूप वर्षे हे काम चालले होते. दिग्दर्शक बदलले, पटकथा-संवाद यांची पुनर्रचना होत असे. बाबूजी या चित्रपटासाठी विलक्षण आग्रही होते. त्यांना भावेपर्यंत पुनःपुन्हा बदल करण्याइतके ते ध्यासमग्न होते. सतत म्हणत, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट पूर्ण झाल्याशिवाय मी मरणार नाही.’ काय जिद्द! केवढी राष्ट्रभक्ती! असा कलावंत भारतमातेच्या पोटी पुन्हा केव्हा जन्माला येईल कोण जाणे!

नंतर बाबूजींची प्रकृती ढासळत गेली. त्यांना पाहिले ते ‘हिंदुजा’ हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दुरून. काय योगायोग, त्याच वेळी त्यांना बघायला विख्यात संगीतकार नौशादजीही तेथे आले होते. बाबूजी तर काही समजण्याच्या जाणिवेपलीकडे होते. त्यांच्याइतकेच थोर संगीतकार त्यांना अश्रूभरल्या डोळय़ांनी काचेतून पाहत होते. दोन संगीतकारांची ती निःशब्द भेट माझ्या मनावर कोरली गेली आहे. ‘बोलावण्यावाचूनही मृत्यू इथे आला जरी थांबेल तोही पलभरी…’ ही सुधीर मोघेंची ओळ मला आठवत राहिली, बाबूजींनीच गायिलेली! परंतु या ओळीने वेगळे रूप धारण केले नि ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ ही गदिमाउक्ती गाणारे बाबूजी त्याच न्यायाने इहलोक सोडून निघाले. मुंबईत अशी महायात्रा तेही एका गायक, संगीतकाराला! न भूतो न भविष्यति असा जनांचा प्रवाहो लोटला होता. नेत्यांची, अभिनेत्यांची लोकप्रियता आपण समजू शकतो. एका गायक व संगीतकाराची अशी प्रचंड लोकप्रियता निदान मी तरी यापूर्वी अनुभवली नव्हती.

बाबूजींची गाणी, त्यांची देशभक्ती, त्यांचे निष्कलंक चारित्र्य यांच्या हकीकती एकमेकांना सांगत बाबूजींना अखेरचा निरोप दिला; त्या क्षणी दिसलेले बाबूजी अखेरचे! पण चिरंजीव स्वरयात्रेचे बाबूजी चिरंजीव आहेत! स्वरातून, आठवणींतून!