
>> डॉ. प्रीतम भि. गेडाम
आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही, आयुष्य हे सतत चालत राहिले पाहिजे, ज्यात सुख आणि दुःखं येत राहतात. समस्यांना घाबरणे किंवा त्यापासून पळणे कमकुवतपणा आहे आणि आत्महत्या हे त्याच कमजोरीवर भ्याडपणाचे लक्षण आहे. जनावरे, पक्षीसुद्धा हार मानत नाहीत आणि कधीही आत्महत्या करीत नाहीत, ते कोणत्याही परिस्थितीत जगायला शिकतात. मग आपण तर माणूस आहोत, आपल्याकडे विवेकबुद्धी, विचारशक्ती आहे. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम आहोत. मदत करण्यासाठी कुटुंब, नातलग, संसाधने, संस्था, प्रशासन, नियम, कायदे आणि इतर सुविधा आहेत. मग आपण हार का पत्करायची, धीर का सोडायचा?
जीवनाच्या धावपळीत बहुतेक लोकांमध्ये तणाव, राग, त्रास, भीती, नैराश्याच्या भावना दिसतात, घरात थोडे रागावले किंवा भांडण झाल्यास पटकन अयोग्य निर्णय घेतात. आजच्या आधुनिक युगात लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत, शिक्षित आणि श्रीमंत ते गरीब अशा सर्व वर्गात आत्महत्येच्या घटना खूप वाढत आहेत, रोज आत्महत्येच्या बातम्या येत असतात.
दरवर्षी जगात 7-8 लाख लोक आत्महत्येमुळे आपला जीव गमावतात. जागतिक स्तरावर 77 टक्के आत्महत्या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. 15-19 वर्षांच्या मुलांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे चौथे प्रमुख कारण आहे. 2012 मधे लॅन्सेटच्या अहवालानुसार, हिंदुस्थानात आत्महत्येचे प्रमाण 15-29 वयोगटात सर्वाधिक होते. हिंदुस्थानात दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो, दररोज सुमारे 28 अशा आत्महत्या होत आहेत.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोद्वारे (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीप्रमाणे 2019 मध्ये देशात दररोज सरासरी 381 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. म्हणजेच वर्षभरात एकूण एक लाख 39 हजार 123 मृत्यू झाले, त्यापैकी 67 टक्के म्हणजे 93 हजार 18 ते 45 वर्षे या वयोगटातील होते, 2018च्या तुलनेत हिंदुस्थानातील तरुणांच्या आत्महत्या चार टक्क्यांनी वाढल्या. 2019 मध्ये आत्महत्या दर 12.70 टक्के होता. ज्यात पुरुष 14.10 टक्के आणि महिला 11.10 टक्के होते. फाशी ही आत्महत्या करण्याच्या प्रयत्नांची सर्वात सामान्य पद्धत मानली गेली. आत्महत्येची काही कारणे व्यावसायिक समस्या, गैरवर्तन, हिंसा, छळ, कौटुंबिक समस्या, आर्थिक नुकसान, अलिप्तपणाची भावना आणि मानसिक विकारामुळे आहेत. आत्महत्यांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये जास्त आहेत. प्रत्येक आत्महत्या विनाशकारी असते आणि मृतकाच्या संबंधित लोकांवर खोल परिणाम करते. तथापि, जागरुकता वाढवून आपण जगभरातील आत्महत्येच्या घटना कमी करू शकतो.
आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही, आयुष्य हे सतत चालत राहिले पाहिजे, ज्यात सुख आणि दुःखं येत राहतात. समस्यांना घाबरणे किंवा त्यापासून पळणे कमकुवतपणा आहे आणि आत्महत्या हे त्याच कमजोरीवर भ्याडपणाचे लक्षण आहे. जनावरे, पक्षीसुद्धा हार मानत नाहीत आणि कधीही आत्महत्या करीत नाहीत, ते कोणत्याही परिस्थितीत जगायला शिकतात. मग आपण तर माणूस आहोत, आपल्याकडे विवेकबुद्धी, विचारशक्ती आहे. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम आहोत. मदत करण्यासाठी कुटुंब, नातलग, संसाधने, संस्था, प्रशासन, नियम, कायदे आणि इतर सुविधा आहेत. मग आपण हार का पत्करायची, धीर का सोडायचा? नेहमी लक्षात ठेवा की, संकटाच्या भीतीने आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. काय आपण जगातील सर्वात दुःखी लोक आहोत का? नाही, बिलकूल नाही. लोक आपल्यापेक्षा जास्त समस्यांना तोंड देत आहेत. समस्यांमुळे केवळ जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे. जेव्हा आपल्याला लोकांच्या समस्या समजतील, तेव्हा कळेल की, आपली समस्या इतरांच्या तुलनेत काहीच नाही आणि वेळही कधी एकसारखा राहत नाही.
समस्या वाढविण्यात सर्वात मोठा हात आपलाच आहे, इतरांवर आपला अतिविश्वास, अतिअपेक्षा किंवा अवलंबित्व, आपल्या वर्तनाचा परिणाम, वाईट संगती, वाईट सवयी, लोभ, जागरुक नसणे, नियमांचे उल्लंघन करणे, संयम आणि समाधानाचा अभाव, आत्मचिंतनाचा अभाव, आपल्या लोकांशी समस्या सामाईक न करणे, लोक काय म्हणतील या विचाराने घाबरणे, समाजात खोटा देखावा करणे, वास्तविकता नाकारणे, जबाबदारी आणि कर्तव्यापासून पळून जाणे, नकारात्मक विचारांचे जाळे विणणे, परिस्थितीनुसार जुळवून न घेणे, रागाच्या भरात अयोग्य निर्णय घेणे, एखादा न्यूनगंड, दडपणाखाली जगणे अशा गुंतागुंती माणसाने स्वतः निर्माण केल्या आहेत, ज्या आपण बुद्धी आणि समजूतदारीने सोडवू शकतो. समस्यांपासून पळून जाणे याला भ्याडपणा आणि मूर्खपणा म्हणतात. कोणतीही समस्या भीतीने नाही, तर समस्येला मात करून दूर होते. जीवनात कितीही संघर्ष असो, जर आपल्याला प्रामाणिकपणाने आणि सत्याने जगायचे असेल तर कधीही लोकांचा विचार करू नका.
दररोज जगभरातील मोठी लोकसंख्या बेघर, निराधार, अनाथांचे, जीवन जगतात ज्यांना पुरेसे अन्न आणि पाणीही मिळत नाही. जगातील अर्धी लोकसंख्या गरिबीत आहे. आजही 75-80 वर्षांची म्हातारी लोकसुद्धा दोनवेळच्या भाकरीसाठी काम करताना दिसतात. इतका त्रास सहन करूनही त्यांचा संघर्ष सुरूच आहे आणि यालाच जिवंतपणा म्हणतात. कारण जीवन अमूल्य आहे. संपूर्ण जगाची संपत्ती विकूनही तुम्ही एका क्षणाचे आयुष्य विकत घेऊ शकत नाही. असे अनेकदा दिसून येते की, आर्थिक संकट उद्भवल्यावर संपन्न कुटुंबातील सुशिक्षित व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करतात, परंतु ते परिस्थितीनुसार जुळवून घेत नाहीत. जर श्रीमंतीनंतर गरिबी आली तर काय झाले, लढायला का घाबरता, हे दिवसही बदलतील.
आत्महत्या रोखणे अनेकदा शक्य होते आणि ते रोखण्यात आपण सर्वजण प्रमुख भूमिका बजावू शकतो. आपल्या कृतीतून, आपण एखाद्याच्या सर्वात वाईट क्षणांमध्ये समाजाचा एक सदस्य म्हणून, मुलाच्या स्वरूपात पालक म्हणून, मित्र म्हणून, सहकारी किंवा शेजारी म्हणून बदल घडवू शकतो. थोडीशी काळजी एक जीव वाचवू शकते आणि संघर्ष करणाऱया व्यक्तीमध्ये आशेची भावना निर्माण करू शकते. संघर्ष करणाऱयांमध्ये सकारात्मक ऊर्जा, प्रोत्साहन, आत्मविश्वास वाढवून त्यांना मजबूत आणि धैर्यवान बनवायचे आहे. आव्हाने, अपयश, पराभव आणि शेवटी प्रगती तेच आहे, जे आयुष्य सार्थकी लावते. कधीही धीर न सोडण्याची सवय जिंकण्याची सवय बनते, त्यामुळे काहीही झाले तरी माणसाने हार मानू नये आणि जेवढे आयुष्य मिळाले आहे ते आनंदाने जगावे.






























































