
>> दि. मा. प्रभुदेसाई
कुठलीही विद्या, कला, ज्ञान गुरुमुखानेच शिकायचे. ते पूर्णत्वास गेल्यावर गुरूच्या आज्ञेने आपणच गुरू होऊन शिष्यांना शिकवायला सुरुवात करायची आणि त्यांना आपल्यासारखेच गुरुत्व प्राप्त करून द्यायचे ही ‘गुरुशिष्य पंरपरा’ हे हिंदुस्थानी संस्कृतीचे मोठे वैशिष्टय़च आहे! हिंदुस्थानात संगीत, नृत्य, नाटय़, वादन अशा अनेक कलाक्षेत्रांत गुरु-शिष्य परंपरा चालू आहे. जो जो ज्या ज्या विद्येचे दान करतो, तो त्या विद्येचा गुरू. जो आपल्या शिष्याला सन्मार्ग दाखवत नाही अशाला ‘गुरू’ म्हणू नये आणि असे गुरू अडक्याला तीन मिळाले तरी घेऊ नयेत असे समर्थ ‘दासबोधा’त सांगतात. ‘अडका’ म्हणजे एक पैशापेक्षाही कमी प्रतीचे त्यावेळचे नाणे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ।
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ।।
आपल्याकडे आरती म्हणून झाली की, शेवटी या दोन ओळी म्हटल्या जातात आणि बहुतेक जणांच्या त्या तेवढय़ाच पाठ असतात, पण या गुरुस्तोत्रात एकूण आठ श्लोक आहेत. या जगातील सर्व काही गुरूच असून त्याने सर्व विश्व व्यापले आहे. गुरू आपल्या शिष्यांच्या, भक्तांच्या अज्ञानाचा नाश आपल्या ज्ञानाने करतात, असे यात सांगितले आहे. यात सर्वसाधारणपणे आठ श्लोक असतात, पण ‘लोकप्रिय दैनिक स्तोत्रे’ या पुस्तकात दिलेले हेच स्तोत्र चौदा श्लोकांचे आहे. याचा कर्ता मात्र अज्ञात आहे. हे आहे ‘श्री गुरुस्तोत्र’.
दुसरे ‘गुरुस्तोत्र’ हे श्रीमद्शंकराचार्यांचे असून त्याचे नाव ‘गुर्वाष्टकम्’ असे आहे. ‘शरीरं सुरुपंतथावा कलत्रं’ अशी त्याची सुरुवात आहे. ‘‘तुम्हाला सुंदर, सुदृढ शरीर, सुंदर अर्धांगी, सर्व प्रकारची सुखसमृद्धी, यश प्राप्त झाले तरी जोपर्यंत तुम्ही गुरुचरणी लीन होत नाही, तोपर्यंत या सगळय़ा सुखसमृद्धीचा काहीही उपयोग नाही, त्याचा काय उपयोग?’’ असा प्रश्न प्रत्येक कडव्यांत विचारला आहे. ‘‘ततः किम ततः किम, ततः किम ततः किम?’’, ‘‘गुरू म्हणजे जीवनाचे सर्वस्व असून तो नसेल तर जीवन व्यर्थ आहे,’’ असे स्तोत्र सांगते. ते आठ कडव्यांचे आहे. या दोन्ही स्तोत्रांना ‘गुरोरष्टकम’ किंवा ‘गुर्वाष्टकम्’ असे म्हणतात. ‘गुरुबिन कौन बताये वाट?’ हे शास्त्र्ााrय गायनातील एक प्रसिद्ध भजन आहे. कुठलीही विद्या, कला, ज्ञान गुरुमुखानेच शिकायचे. ते पूर्णत्वास गेल्यावर गुरूच्या आज्ञेने आपणच गुरू होऊन शिष्यांना शिकवायला सुरुवात करायची आणि त्यांना आपल्यासारखेच गुरुत्व प्राप्त करून द्यायचे ही ‘गुरुशिष्य पंरपरा’ हे हिंदुस्थानी संस्कृतीचे मोठे वैशिष्टय़च आहे!
पूर्वीच्या मोठमोठय़ा लेखकांनी, संतांनी -विशेषतः मराठी- आपल्या ग्रंथाची सुरुवात प्रथम श्रीगणेश व नंतर श्रीगुरू वंदनाने केलेली आढळते. संत ज्ञानेश्वर किंवा समर्थ रामदास आपल्या अनुक्रमे ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ या ग्रंथांच्या गुरुवंदनात ग्रंथाचे सर्व श्रेय आपल्या गुरूंना देतात.
श्री ज्ञानेश्वरांचे गुरू म्हणजे त्यांचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ ‘ज्ञानेश्वरी’ लिहून पूर्ण झाल्यावर तिचे सर्व श्रेय निवृत्तीनाथांना देताना म्हणतात,
‘‘मजलागी ग्रंथाची स्वामी। दुजी सृष्टी हे जे केले तुम्ही।
ते पाहोनि हंसों आम्ही। विश्वमित्रातेही।।’’
‘गुरू’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘आकाराने मोठा’ असा आहे. सर्व ग्रहांत आकाराने मोठा असलेला म्हणून तो ग्रह ‘गुरू’. इथे ‘गुरू’ या शब्दाचा अर्थ ज्ञानदान करणारा असा आहे.
‘‘जे जे काही उत्तम गुण। ते ते सद्गुरूचे लक्षण।।’’
हिंदुस्थानात संगीत, नृत्य, नाटय़, वादन अशा अनेक कलाक्षेत्रांत गुरु-शिष्य परंपरा चालू आहे. जो जो ज्या ज्या विद्येचे दान करतो, तो त्या विद्येचा गुरू. जो आपल्या शिष्याला सन्मार्ग दाखवत नाही अशाला ‘गुरू’ म्हणू नये आणि असे गुरू अडक्याला तीन मिळाले तरी घेऊ नयेत असे समर्थ ‘दासबोधा’त सांगतात. ‘अडका’ म्हणजे एक पैशापेक्षाही कमी प्रतीचे त्यावेळचे नाणे.
अध्यात्माचे ज्ञान देणाऱयांनाही ‘गुरू’ हा शब्दच वापरला जातो. ‘अध्यात्म’ म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी जी काही कर्मकांडे, तपश्चर्या करावी लागते ते ज्ञान. शरीरावर, मनावर ताबा ठेवून षड्विकारांचे दमन, शमन करून, सद्गुणांचे वर्धन करून, मनाची एकाग्रता साधून, शरीरांतर्गत ऊर्जा जागवून, बाहेरच्या जगास विसरून मनाच्या एका विशिष्ट अवस्थेत म्हणजे ‘समाधी’त जाणे. या विपरीत वर्तन करून गेल्या काही वर्षांत बरेच ‘गुरू’ गाजले व सरकारचे विशेष पाहुणे झाले.
योग मार्गातील एक साधन म्हणजे ‘अष्टांगयोग’. ज्यामध्ये यम, नियम, प्राणायाम इत्यादी क्रिया करून मन ताब्यात आणायचे असते आणि शरीर वेगवेगळय़ा आसनांनी. त्यातील हा एवढाच भाग आज जगात योगा म्हणून प्रसिद्ध झाला आहे. इंग्रजी लिपीप्रमाणे ‘योग’मधल्या ‘ग’ म्हणजे इंग्रजीतील ‘जी’नंतर ‘ए’ येतो म्हणून ‘योग’चे ‘योगा’ झाले आणि ‘योगा’ म्हणजे आसन! आज योगा म्हणजे अनेकांच्या पोटापाण्याचा व्यवसाय झाला आहे.
1400 वर्षे वयाचे ‘चांगदेव’ ज्ञानदेवांना भेटायला वाघावर बसून, हातात सापाचा चाबूक घेऊन आला तेव्हा निर्जीव भिंतीवर बसलेल्या ज्ञानदेवांनी त्या भिंतीलाच एखाद्या सजीव वाहनासारखे चांगदेवासमोर नेले. हे पाहिल्यावर चांगदेवाचा सर्व गर्व गळून पडला आणि तो त्यांना शरण गेला. मुक्ताईने त्याला उपदेश केला, त्याला सांगितले, ‘‘तू काळावर विजय मिळवून एवढी वर्षे जगलास, पण स्वतःच्या मनावर तुला विजय मिळविता आलेला नाही म्हणून तू हे सर्व बालदेखावे उभे करतोस. स्वतःच्या मनावर प्रथम विजय मिळव.’’ चांगदेवाने तिला आपले गुरू केले. एकदा तो मुक्ताईकडे गेला असता ती स्नान करत होती, ओलेती होती. ते पाहून चांगदेवाने तोंड फिरवले. मुक्ताईने त्याला सांगितले, ‘‘बाहेरच्या नश्वर शरीराकडे नव्हे, तर आतल्या अमर आत्म्याकडे लक्ष दे.’’ षड्विकारांवर ताबा मिळविणे व चित्त परमेश्वराकडे एकाग्र करणे ही दोन तत्त्वे चांगदेव शिकला. त्याला केलेला उपदेश ‘चांगदेव पासष्टी’ म्हणून प्रसिद्ध आहे.
एवढेच नव्हे, तर समाजाकडून मिळणारी वागणूक पाहून उद्विग्न झालेले ज्ञानेश्वर झोपडीचे दार लावून आत बसले. कोणाचेही ऐकेनात, दार उघडेनात. तेव्हा त्यांच्या या लहान बहिणीने त्यांनासुद्धा ‘‘काम, क्रोध मागे सारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।। जग अग्नी झाले तर तुम्ही पाणी होऊन वणवा विझवा’’ असा उपदेश केला. ‘ताटीचे अभंग’ म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
शिक्षकांनाही आपण ‘गुरू’च म्हणतो. ‘गुरुजी’ हे त्याचे आदरार्थी रूप, पण आजचे गुरू हे ‘पोटार्थी’ म्हणजे पैसे घेऊन ज्ञान विकतात. म्हणून समर्थ त्यांना ‘गुरू’ म्हणायला तयार नाहीत. आजच्या या काळात निरपेक्षतेने विद्यादान करणे अशक्यच आहे. मोबदला तर घ्यावाच लागतो. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ‘गुरुपद’ मिळविणे कठीणच आहे.





























































