वैविध्यपूर्ण भूमिका महत्त्वाच्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या मराठी रंगभूमीवर ‘संज्या छाया’ या नाटकाचे जवळ जवळ दोनशे प्रयोग पूर्ण होत आहेत. या नाटकात ‘किशोर’ ही व्यक्तिरेखा साकारणारा आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये ‘मिहीर’ ही भूमिका साकारणारा युवा अभिनेता म्हणजे राजस सुळे… एक प्रॉमिसिंग चेहरा.

राजसचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयातील इंग्रजी माध्यमात झाले. शाळेत असल्यापासून राजसला संगीत, नृत्य आणि अभिनय या कलांची आवड होती. दहावीनंतर पार्ल्याच्याच डहाणूकर कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला. राजस म्हणतो, ‘‘डहाणूकर कॉलेजमध्ये ‘नाटय़मंडळ’ आहे. आम्ही युथ फेस्टिव्हल, आयएनटी एकांकिका स्पर्धा यांमध्ये सातत्याने भाग घेत होतो. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात तर मी एकांकिका, मिमिक्री, वेस्टर्न ग्रुप सिंगिंग अशा अनेक स्पर्धांत भाग घेऊन यश मिळवले होते. अभिनय क्षेत्रात करीअर करायचे हे हळूहळू ठरत होते.’’ राजसने डहाणूकरमधूनच मास मीडिया विभागातून पदवी मिळवली. त्याने एलएलबीदेखील पूर्ण केले आहे.

त्यादरम्यान कोरोना आला आणि सगळे चित्रच बदलले. मनोरंजन सृष्टीवर खूप मोठा परिणाम झाला. प्रत्यक्ष भेटून एखादी ऑडिशन न देता व्हिडीओ चित्रित करून ऑडिशन पाठवणे सुरू झाले. याच काळात राजसने ‘मन शुद्ध तुझं’ या मालिकेत काम केले होते. त्यानंतर त्याला ‘संज्या छाया’ नाटकात ‘किशोर’ ही भूमिका मिळाली. राजस म्हणतो, ‘‘किशोर हा परदेशी राहणारा एक मुलगा असून तो कुणालचा मित्र आहे. हिंदुस्थानात आल्यावर तो कुणालच्या आई-वडिलांसाठी एक निरोप घेऊन आला आहे. किशोर हा थोडासा भित्रा, आई-वडिलांच्या धाकात वाढलेला, अतिशय निरागस असा आहे. या नाटकात काम करताना खूप काही शिकता आले.’’

राजसने ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शनदेखील केले आहे. ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये ‘मिहीर’ ही भूमिका तो करत आहे. तो म्हणतो, ‘‘मिहीर हा सागरचा मित्र आहे. सागरचा तो आदर करणारा असून तो समंजस आहे. त्याचे मिहिका नावाच्या मुलीवर प्रेम आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमुळे माझ्या नावाला एक नवीन ओळख मिळाली आहे.’’ विविध माध्यमांत काम करून वैविध्यपूर्ण भूमिका करण्याची राजसची इच्छा आहे.

हीच तर खरी गंमत
राजस म्हणतो, ‘‘अभिनय हे असे क्षेत्र आहे की, जिथे तुम्हाला वेगवेगळय़ा भूमिका करता येतात. त्यामुळे मानसशास्त्र आपण अभ्यासू शकतो. आपण विविध माणसांची स्वभाव वैशिष्टय़े एखाद्या भूमिकेच्या निमित्ताने अभ्यासू शकतो आणि हीच तर अभिनय क्षेत्राची खरी गंमत आहे. भविष्यातदेखील विविध प्रकारच्या भूमिका करून त्या भूमिकांना न्याय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.’’

गणेश आचवल