लेख – वेळ आहे सुजाण नागरिक बनण्याची!

>> डॉ. सचिन भट

ट्रॉमामुळे होणाऱया मृत्यूंचे आणि अशा अपघातांपायी येणाऱया अपंगत्वाचे प्रमाण कमीत-कमी राखण्याची गरज नेहमीच अधोरेखित केली जाते. एक गुड समॅरिटन अर्थात एक चांगली परोपकारी व्यक्ती म्हणून या कामी तुम्ही आपले योगदान कसे देऊ शकता याबद्दलही सतत आग्रह धरला जातो. संपूर्ण मानव जात आज एका परिवर्तनातून जात आहे आणि या बदलातून जात असताना चांगले नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱयांकडे लक्ष देण्याची वेळ आता आली आहे. हे कसे साध्य करता येईल याबाबत केलेला उहापोह.

कोविड-19 पॅनडेमिकने आपले जगणे आणि निसर्ग व मानवाप्रती आपल्या कृती यात शिस्तीने वागण्यास भाग पाडले आहे. संपूर्ण मानवजात आज एका परिवर्तनातून जात आहे असे आज आपण खात्रीपूर्वक म्हणू शकतो आणि या बदलातून जात असताना चांगले नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱयांकडे लक्ष देण्याची वेळ आता आली आहे.

नागरिक म्हणून आपले सगळ्यात मोठे कर्तव्य म्हणजे प्राणघातक अपघातांमध्ये सापडलेल्या व दुखापती झालेल्या व्यक्तींना मदतीचा हात देणे, त्यांची काळजी घेणे. डब्ल्यूएचओच्या 2018 च्या रस्ते सुरक्षाविषयक जागतिक अहवालानुसार रस्त्यावरील अपघातांमुळे होणाऱया अपघातांच्या संख्येबाबत हिंदुस्थान हा 199 देशांमध्ये पहिल्या स्थानावर आहे. नॅशनल क्राइम रेकाॅर्डस् अहवाल ब्युरोने हिंदुस्थानात 2019 मध्ये झालेले अपघाती मृत्यू व आत्महत्यांची आकडेवारी मांडणारा अहवाल सप्टेंबर 2020 मध्ये प्रकाशित केला. त्यानुसार गेल्या वर्षी हिंदुस्थानातील 139,123 जणांनी आत्महत्या केली तर 421,104 जण अपघातांत मृत्युमुखी पडले.

ट्रॉमा म्हणजे काय?

ट्रॉमा म्हणजे वैद्यकीय मदतीची गरज आवश्यक असणारी कोणतीही दुखापत. देशामध्ये रस्ते अपघातांतून ट्रॉमाची बहुतांश प्रकरणे सामोरी येतात. ‘गोल्डन अवर’ म्हणून ओळखल्या जाणाऱया अपघातानंतरच्या पहिल्या तासाभरात रुग्णाला मदत मिळाली तर त्यांच्या वाचण्याच्या शक्यता पैक पटींनी वाढतात. शिवाय सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये रस्ते अपघातांची संख्या घटली आहे, पण त्यामुळे घरात अडकून पडलेल्या अनेक वयोवृद्ध व्यक्तींनी वृद्धापकाळामुळे होणाऱया फ्रॅक्चर्सची प्रकरणे या काळात वाढली आहेत. हिप फ्रॅक्चर झालेल्या वृद्ध मंडळींना हॉस्पिटलमध्ये नेणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण बरेचदा अशी फ्रॅक्चर्स झाल्यानंतर लगेच उपचार मिळाल्यास व्यक्तीचे प्राण वाचण्याची व अपंगत्व टळण्याची शक्यता जास्त असते.

म्हणूनच लोकांनी ट्रॉमा केअरतज्ञ आणि पॅरामेडिक्सना अनेक आयुष्य वाचविण्याच्या कामी मदत करण्याच्या पद्धती शिकून घेणे गरजेचे आहे.

एक उत्तम परोपकारी कृती

हिंदुस्थानात मात्र अपघातात सापडलेल्या व्यक्तींची मदत करणे म्हणजे पोलीस आणि नको त्या कायदेशीर कटकटींमध्ये अडकणे असा सार्वत्रिक समज दिसतो. तरीही 2016 मध्ये केंद्र सरकारने ‘गुड समॅरिटन कायदा’ लागू केला आहे जो अपघातात सापडलेल्या व्यक्तींना संकटातून वाचविणाऱया व्यक्तींना संरक्षण देऊ करतो.

अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिक पुढील काही पावले उचलू शकतात –

1.परिस्थितीचा अंदाज घेणे, रुग्णाची आणि रुग्णाला तपासणाऱयाची सुरक्षितता यास सर्वाधिक प्राधान्य मिळायला हवे.
2.कोणत्या प्रकारची दुखापत झाली आहे याचा अंदाज घेणे आणि रुग्णवाहिका (108) सेवा व पोलीस (100) यांना लवकरात लवकर काॅल करणे.
3.अपघातात सापडलेली व्यक्ती बेशुद्ध असेल तर तिला जागे होण्याच्या स्थितीमध्ये म्हणजे एका बाजूवर झोपलेल्या व तोंड उघडलेल्या स्थितीमध्ये ठेवणे. तिची मान मागे झुकलेली व हनुवटी वर उचललेली असावी.
4.पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याची आशंका असेल तर अशा व्यक्तीला हलविण्याचा प्रयत्न करू नका.
5.रक्तस्त्राव होत असेल तर स्वच्छ कपडय़ाने त्या जागी दाब द्या.
6.बेशुद्ध किंवा अर्धवट शुद्धीत असलेल्या व्यक्तीला पाणी देऊ नका.
7.रुग्ण श्वास घेण्यासाठी धडपडत असेल तर वायूमार्ग मोकळा करा आणि कोणत्या कारणामुळे श्वास घेण्यास अडचण येत आहे याचा अंदाज घ्या.

ट्रॉमा केअरमध्ये झालेल्या नव्या सुधारणा

लोकांकडून कोणत्या स्वरूपाची काळजी घेतली जाऊ शकते हे आपण पाहिले, पण ट्रॉमा केअरच्या क्षेत्रामध्ये झालेल्या काही नवीनतम सुधारणांबाबत जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी दुखापती झालेल्या किंवा अनेक ठिकाणी फ्रॅक्चर्स झालेल्या व्यक्तींना पुन्हा आपल्या पायांवर उभे राहण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागण्याचे व अपंगत्वाला सामोरे जावे लागण्याचा काळ आता जुना झाला आहे. नवनवीन तंत्रे आणि नवीन ऑर्थोपेडिक व फ्रॅक्चर इम्प्लान्टस् यामुळे आज अपघाताचे बहुतांश रुग्ण हे लवकर बरे होतात व एक चांगले आयुष्य जगू शकतात.

मिनिमल इन्व्हेसिव्ह फ्रॅक्चर सर्जरीसारख्या शस्त्रक्रियेच्या नवनव्या पद्धतींमुळे रक्तस्त्राव आणि त्याच्या संबंधित अपंगत्वाचे प्रमाण कमीत कमी राखले जाते व रुग्णाना लवकरात लवकर आपली दिनचर्या पूर्वीप्रमाणे सुरू करता येईल याची काळजी घेतली जाते. मिनिमल इन्व्हेसिव्ह तंत्रांमध्ये शरीरावर छोटे छेद देऊन किंवा चीर पाडून इम्प्लान्टस् बसविले जातात. नव्या पद्धतीची इम्प्लान्टस् ही शरीर रचनेशी अधिक मिळतीजुळती असतात व ती हाडांवर अचूकपणे बसतात ज्यामुळे रुग्ण दुखण्यातून लवकर बरे होतात व शस्त्रक्रियेचे अधिक चांगले परिणाम मिळतात.

ट्रॉमा केअरविषयी माहिती असणे हे अनेक जीव वाचविण्याच्या दृष्टीने जितके महत्त्वाचे आहे तितकाच सरकारी यंत्रणा आणि आरोग्यसेवा पुरविणाऱयांकडून मिळणारा प्रतिसादही महत्त्वाचा आहे. तेव्हा आपली आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त जागरुकता निर्माण करण्यासाठी व या कामी देशभरातील नागरिकांची मदत मिळविण्यासाठी आपण सारेच वचनबद्ध होऊ या.

आपली प्रतिक्रिया द्या