लेख – ‘निर्वाहन’ दिवस!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

वास्तविक ‘निर्वाह’ म्हणजे उपजीविका अशा अर्थी आपण हा शब्द वापरतो. शीर्षकातल्या ‘निर्वाहन’चा त्याच्याशी संबंध नाही. 22 सप्टेंबर या दिवशी जगात ‘कार-फ्री’ दिवस पाळला जातो. त्याला रस्त्यावर शक्यतो पेट्रोलजन्य इंधनाचे वाहन आणू नये असा संकेत आहे. म्हणून ‘निर्वाहन’ दिवस म्हटले इतकेच.

तर, मूळ मुद्दा या ‘कार-फ्री’ दिवसाची गरज का जाणवू लागली? एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कुतूहलाचा आणि विस्मयाचा विषय असलेली सर्वच आधुनिक वाहने विलक्षण वेगात धावू लागल्याने पारंपरिक पालख्या, मेणे, बैलगाडी, घोडागाडी (त्यापूर्वी रथ वगैरे) वाहने आपोआप मागे पडली. याचा अर्थ ही वाहने आज वापरात नाहीत असे नव्हे. खेडोपाडय़ांत आपल्याकडे बैलगाडी सर्रास दिसते. क्वचित मुंबईतल्या रस्त्यावरूनही संथ गतीने जात असते. घोडागाडी किंवा बग्गी अथवा ‘व्हिक्टोरिया’ हे तर मुंबईतले एकेकाळचे वैशिष्टय़. एवढेच कशाला ‘टॅम’ सुरू झाल्यावर रुळावरची ‘ट्रम’ अश्वशक्तीवरच चालायची. म्हणूनच पुढे स्वयंचलित कार-इंजिने आली तेव्हा त्यांची शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती किंवा ‘हॉर्सपॉवर’ हे परिमाण ठरवले गेले. इंग्लंडमध्ये सुरुवातीचे रेल्वेचे रूळ घोडागाडीच्या चाकांमधील रुंदीएवढेच होते.

पुढे वाहनव्यवहारात वेगाने बदल घडले. दगडी कोळशावर चालणाऱया वाफेच्या इंजिनाच्या ट्रेन आमच्या लहानपणीही होत्या. अर्थात मुंबईत विजेवर चालणारी लोकल 1932 मध्येच आली. तरीही जगात काही ठिकाणी कोळशाचे इंधन ट्रेनसाठी आजही वापरले जाते. यात ‘क्रांती’ घडली ती पेट्रोलचा प्रचंड उपसा आखाती समुद्रातून सुरू झाल्यावर. या ‘काळय़ा सोन्या’ने आखातातल्या देशांना मालामाल केलेच, पण त्याचबरोबर साऱया जगाला हे खनिज तेल विकून इंधनपुरवठा सुरू केला. जगात मग कित्येक ठिकाणी खनिज तेलाचे भूमिगत किंवा सागरात दडलेले साठे शोधण्याची व्यापक मोहीम सुरू होऊन प्रचंड प्रमाणावर मिळालेल्या खनिज तेलाचे इंधनसाम्राज्य नि त्यातून देशोदेशीचे राजकारणही निर्माण झाले.

विसाव्या शतकाच्या आरंभी हिंदुस्थानातील श्रीमंत लोक किंवा राजेरजवाडय़ांकडे असणाऱया मोटारी हा प्रजेच्या कुतूहलाचा विषय असायचा. अगदी या शतकाच्या पहिल्या पाऊणशे वर्षांत देशात मोटारींची संख्या कमीच होती. मुंबईसारखी महानगरे वगळता इतरत्र वाहन व्यवहार पारंपरिक आणि त्यामुळे आपोआपच पर्यावरणस्नेही किंवा ‘इको-फ्रेंडली’ होता. मात्र मोटारी, ट्रक, बस, स्कूटर, बाईक वगैरे पेट्रोल-डिझेलवर आधारित वाहनांच्या व्यवसायाला गती आली आणि त्यांचा सोयीचा वापर वाढू लागला तसा त्यांचा पृथ्वीवरील वावरही वाढला. हजारो किलोमीटरचे मोटरेबल किंवा मोटारयोग्य रस्ते तयार झाले. 1928 च्या प्रचंड आर्थिक मंदीनंतर अमेरिकेने ‘फ्री-वे’ बांधणीचा प्रचंड कार्यक्रम हाती घेतला आणि हिंदुस्थानच्या सुमारे तीनपट भूभाग असलेल्या देशात प्रशस्त रस्त्यांचे नियोजनबद्ध जाळे उभारले. पुढे अनेक देशांना ‘इफ्रास्ट्रक्चर’ निर्माण करून उद्यमशीलता वाढवण्यासाठी रस्तेबांधणीचे प्रकल्प हाती घ्यावे लागले आणि ते योग्यच होते.

प्रश्न नुसत्या उद्योजकतेचा नाही. नवनव्या इंधनांवर चालणाऱया यंत्रांमधून कोणत्या प्रकारचे प्रदूषण निर्माण होईल आणि ते कोणत्या ‘थरा’ला जाईल याची कल्पना सुरुवातीला नसल्याने या इंधनांचा अमर्याद वापर सुरू झाला. परिणामी पृथ्वीवरचे प्रदूषण आणि उष्णता वाढली. यामध्ये व्हेईक्युलर म्हणजे वाहनांच्या इंधनामुळे होणाऱया प्रदूषणाचा वाटा खूप मोठा होता. त्यातच वातानुकूल यंत्रणा, शीतकपाटे यासाठी क्लुरोफ्लोरोकार्बनचा झालेला वापर नंतर त्रासदायक ठरू लागला. पृथ्वीच्या वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढून सर्वच सजीवांना त्याचा फटका बसला. मुख्यत्वे श्वसनाचे विकार वाढले. याशिवाय वनसंपदेवरही परिणाम झाला. जलचरांचे जीवन धोक्यात येऊ लागले आणि आता तर सागरी पाण्याची पातळी 2050 पर्यंत वाढून जगातली महत्त्वाची, मुंबईसह इतर किमान बारा किनारी महानगरे पाण्याखाली जाऊ शकतात असे भाकीत आहे. ते खरे ठरले तर भयावह आहे.

सप्टेंबरमध्येच ‘ओझोन’ दिवसही येतो. ओझोन वायू म्हणजे ऑक्सिजनचे तीन मूलकण (ओ-थ्री) त्याचे कवच निसर्गतः पृथ्वीभोवती 15 ते 35 किलोमीटरवर असते आणि सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायलेट (अतिनील) किरणांपासून ते आपले रक्षण करते. 1913 मध्ये ओझोनची निश्चिती होऊन ऑक्सिजनच्या 10 लाख मूलकणांमध्ये एक एवढे त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तो कृत्रिमरीत्या निर्माण करणे फार जिकरीचे आहे. त्यामुळे आहे तो ओझोन टिकवायचा तर पृथ्वीवरचे प्रदूषण आटोक्यात आणायला हवे.

त्यासाठी जे उपाय योजले जातात त्याची चर्चा होतेच, पण सामान्य माणसेही प्रदूषण कमी करायला हातभार लावू शकतात. कारचा अप्रतिष्ठsपेक्षा आवश्यकतेनुसार वापर केला तर बरेच वाहन प्रदूषण कमी होईल. एरवी वाहनांच्या गर्दीत ‘चिरडलेले’ रस्ते एक दिवस मोकळा श्वास घेतील आणि त्यांचे प्रशस्त रूप दिसू लागेल. शिवाय एक दिवस ‘चालत’ जाण्याचा उपक्रम केला तर मोकळय़ा मार्गावरून शुद्ध हवेत तेही आरोग्यदायी ठरेल. अशा अनेक हेतूंनी हा कार-फ्री किंवा ‘निर्वाहन’ दिवस पाळला जातो. हे प्रयत्न प्रतीकात्मक असले तरी जागृती निर्माण करणारे आणि आपले उद्याच्या जीवनाचे निर्वाहन सुखाचे करणारे म्हणून त्यांचे महत्त्व!