सिनेमा – चौदहवी का चांद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वहिदा रेहमान म्हणजे संवादरहित अभिनय असं जणू समीकरणच झाल्याचं अनेक चित्रपटातून जाणवतं आणि हे त्या काळच्या अनेक दिग्दर्शकांना माहीत असल्यामुळे त्यांनी वहिदाजींना संवाद न देता तशा प्रकारचा अभिनय करण्याची संधी दिलेली आहे. एखाद्या सीनमध्ये त्यांच्या वाटय़ाला एकही ओळ नसली तरीही केवळ डोळ्यांच्या हालचाली आणि मुद्राभिनयातून त्या जे काही इतक्या सहजतेने व्यक्त करतात की त्यामुळे त्यांची गाणी आणि त्यांच्या सगळय़ा भूमिकांना एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. अशा या मुद्राभिनयाच्या ‘चौदहवी का चांद’विषयी…

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याबाबत एक दंतकथा मी ऐकली होती. पाच अप्सरांना पृथ्वीवर यायचं होतं. त्यांनी देवाला विनंती केली की, आम्हाला पृथ्वीवर जायचं आहे. देव म्हणाले, एक अट आहे. तुम्हाला एकच दिवस पृथ्वीवर जाता येईल आणि सूर्यास्तापर्यंत तुम्हाला स्वर्गात परत यावं लागेल. जर हा नियम मोडला तर तुम्हाला पृथ्वीवरच थांबावं लागेल. अप्सरा तयार झाल्या आणि अजिंठय़ाच्या परिसरात उतरल्या. तिथली लेणी, चित्रं, शिल्पकला आणि बुद्धाचं तत्त्वज्ञान समजून घेताना  त्यांचं भान हरपलं. संध्याकाळ झाली. दिवस कधी संपला त्यांना कळलंच नाही. त्यांचा परतीचा रस्ता बंद झाला आणि त्या पाचही अप्सरांचं सुंदर शिल्पात रूपांतर झालं. त्यातली एक अप्सरा खूप पुण्यवान होती. त्यामुळे तिचा पृथ्वीवर पुनर्जन्म झाला. ती अप्सरा म्हणजे वहिदा रेहमान होय.

लतादींदीच्या स्वर्गीय आवाजाने अनेक गाणी स्मरणीय झाली आहेत. ‘काटो से खींच के ये आंचल…’ हे गाणं लताजींच्या स्वर्गीय आवाजाबरोबर वहिदा रेहमान यांचा अभिनय आणि स्वर्गीय सौंदर्याचा परिसस्पर्श झाल्याने जास्त दर्शनीय झालं आहे. ते पाहण्याचा अनोखा अनुभव अवर्णनीय आहे. वहिदा रेहमान म्हटलं की, पहिल्यांदा  डोळ्यासमोर येते ती ‘गाईड’मधली आकाशी साडी परिधान केलेली  देव आनंदबरोबर गवताने भरलेल्या ट्रकमधून प्रवास करणारी. स्वतंत्रपणे जीवन जगण्यास निघालेली एक आधुनिक तरुणी. ‘आज फिर जीने की तमन्ना है…’ गात स्त्रीजातीला जागवण्याचं भान आणि जगण्याचं भान देणारी भारतीय शिल्पकलेतली अजिंठय़ाच्या शिल्पातून अवतरलेली अप्रतिम सौंदर्याची मलिका म्हणजे वहिदा होय.

कृष्णधवल काळातल्या ‘सी.आय.डी.’पासून वहिदा रेहमान यांचा चित्रमय प्रवास सुरू झाला. त्यांचा हा प्रवास मंत्रमुग्ध करणारा आहे. कारण कृष्णधवल ते रंगीत सिनेमामध्ये आपल्या सौंदर्याने पडदा व्यापून टाकणारी वहिदा रेहमान अभिनयातही अव्वल होती. ‘बीस साल बाद’मधल्या एका दृश्यात विश्वजीत जेव्हा पाणी पिण्याच्या बहाण्याने तिच्याशी म्हणजे खेडय़ातल्या मुलीशी बोलतो तेव्हा तो तिच्याकडे पाहणार याची जाणीव तिला असते. ती जाणीव ठेवून वहीदा रेहमान पाण्याचा माठ त्याच्याकडे न पाहता रिकामा करते. तो मात्र पाणी न पिता केवळ तिच्याकडे पाहत असतो. या छोटय़ाशा दृश्यात पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावरचा राग दिसतो. नाक मुरडण्यातून  नापसंती दिसते. माठातलं पाणी जसजसं संपत जातं तसतसं तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसू लागतं. नंतर भयाचे भाव येतात. तिच्या चेहऱ्यावरचे आणि डोळ्यातले भाव

कॅमेरा टिपतो आणि  प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. आपल्याला आवश्यक वाटणारे भाव नायिकेच्या चेहऱ्यावर छानपैकी दिसले असं दिग्दर्शकाच्या लक्षात आलं की तो अशा प्रकारच्या दृश्याची पेरणी करतो. जिथे नायिकेला एकही संवाद नसतो. केवळ चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यांच्या हालचालीने ती बोलते.

‘सोलवा साल’मध्ये ट्रेनमधलं ‘है अपना दिल तो आवारा…’ या गाण्यात तरुण देव आनंदच्या मनात सुंदर तरुणीला पाहून जे काय वाटतं ते गाण्यातून व्यक्त होतं. तेव्हा ती ज्या नाराजीने, वैतागाने जो मुद्राभिनय करते तो एकदम लाजवाबच आहे. डोळ्यांच्या जलद हालचाली करून नाकावर असणारा राग आणि मनातली अस्वस्थता ती खूपच छान पद्धतीने व्यक्त करते. या गाण्यात नायक देव आनंद गाणं गातोय. तिच्या वाटय़ाला एकही ओळ नाही तरीसुद्धा ती केवळ डोळ्यांची हालचाल आणि मुद्राभिनयातून जे काही व्यक्त करते ते अगदी सहज असतं. अभिनय करताना संवाद हवेतच असं नाही, न बोलता खूप काही बोलणं अशा अभिनयाने त्या गाण्याची असणारी लज्जत वाढते ते गाणं लोकप्रिय होतं. वहिदा रेहमान यांनी अभिनय कौशल्यावर या गाण्याला एक उंची प्राप्त करून दिली आहे.

‘कालाबाजार’मधल्या ‘अपनी तो हर आह एक तुफान है…’  या गाण्यातही झोपेतून उठलेल्या वहिदाजींने असा काही मुद्राभिनय केला आहे की वा रे वा! नायक देव आनंद उपरवाला म्हणजे ईश्वराशी  बोलतोय हे कळल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान सहजतेने  व्यक्त होतं.  एका बाजूला देव आनंदचं गाणं आणि दुसऱ्या बाजूला शब्दाविना वहिदा रेहमान यांचा अभिनय! अपेक्षित, अनपेक्षित विचारांचं मुद्राभिनयातून केलेलं सुंदर सादरीकरण आणि ते करण्याची कला लाभलेली अभिनेत्री म्हणजे वहिदा रहमान होय.

देव आनंदसोबतचा त्यांचा आणखी एक चित्रपट ‘प्रेम पुजारी’ यातलं ‘रंगीला रे’ गाणं थोडंसं पाश्चात्य संगीताकडे झुकणारं आहे आणि त्यात आपला प्रियकर बिलकुल ओळख देत नाही, त्यामुळे नायिकेच्या मनाला आलेली उद्विग्नता आणि तिचा होणारा मानसिक संघर्ष या गाण्यातून व्यक्त होतो. प्रियकराने फसवल्याने दुःखी नायिका त्याला दुसऱ्या तरुणीबरोबर पाहते तेव्हा तिच्या हृदयाची होणारी तगमग तिच्या चेहऱ्यावर वेदनेसह उमटते. ते लाजवाब आहे. या गाण्यात नृत्य असं नाही, पण वहिदाजींनी शरीराच्या वेगवेगळ्या हालचालीतून अत्यंत तीव्रतेने जे काही सादर केलं आहे ते सुंदर नृत्य आहे. जे अतिशय परिणामकारक आहे. हे कळायला प्रेक्षकही तितक्या ताकदीचा हवा. वहिदाजी भूमिका समजून घेउढन, त्या जगण्याच्या सौंदर्याचा प्रवास सहजपणे करतात.  तो उलगडलेला प्रवास आपल्याला समजून आपण त्याला दाद देणं यालाच चित्रपट क्षेत्रामध्ये उत्तम नजर असलेला जौहरी प्रेक्षक असं म्हणता येईल.

नायक कोण आहे, याचाही बऱ्याचदा नायिकेच्या अभिनयावर  परिणाम होत असतो. ‘दिल दिया दर्द लिया’मध्ये दिलीप कुमार नायक आहे आणि नायिका वहिदा रेहमान ज्यात त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव रूपा आहे. दिलीप कुमार म्हणजे शंकरचं लहानपणापासूनच रूपावर प्रेम आहे. खलनायक प्राण वहिदा रेहमानचा भाऊ आहे. वहिदाजींच्या  मुद्राभिनयाशी परिचित असणाऱ्या दिग्दर्शकाने एका दृश्यात प्राण, रूपासमोर शंकरचा वारंवार अपमान करतो. ती काहीच बोलू शकत नाही. ती खुर्चीवर बसलेली आहे. ती काहीतरी विणकाम करत आहे. तिचं त्या कामात अजिबात लक्ष नाही. तिला होणारा त्रास, तिची अस्वस्थता,भावाविषयी  मनात निर्माण झालेला तिरस्कार रूपा डोळ्यांच्या आणि चेहऱ्यांच्या हालचालीतून ज्या पद्धतीने व्यक्त करते त्याला तोड नाही. वहिदा रेहमान म्हणजे संवादरहित अभिनय असं जणू समीकरणच झाल्याचं अनेक चित्रपटांतून जाणवतं आणि हे त्या काळच्या अनेक दिग्दर्शकांना माहीत असल्यामुळे त्यांनी आपल्या चित्रपटातून वहिदाजींना संवाद न देता तशा प्रकारचा अभिनय करण्याची संधी दिलेली आहे.

हे त्यांना लीलया जमण्याचं कारण म्हणजे वहिदाजी एक उत्कृष्ट भरतनाटय़म नर्तकी आहेत. त्यामुळे भरतनाटय़ममधून शिकलेल्या मुद्रा व अभिनयाचा त्यांनी अत्यंत कौशल्यपूर्वक आपल्या भूमिकांमध्ये उपयोग केलेला आहे. अर्थात दिलीप कुमारसारख्या अभिनयसम्राटासमोर पहिल्याच इमोशनल दृश्यात त्या कुठेही कमी पडत नाहीत.

अवखळ, खेळकर वहिदा, लाजाळू वहिदा, प्रेमळ वहिदा, प्रेमात तडफडणारी वहिदा, शास्त्रीय नृत्यकुशल वहिदा… प्रत्येक अदा बखुबी व्यक्त करणारी अशी वहिदा एकच असते. वहिदा रेहमान यांना अनेक चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित  करण्यात आलं आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण हे बहुमान मिळालेले आहेत. अशा या चतुरस्र अभिनेत्री वहिदा रेहमान यांना त्यांच्या भविष्यासाठी आरोग्यमय शुभकामना…!!!

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)