लेख – माओवादीविरोधी अभियान : डावपेच बदलणे आवश्यक

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

बस्तर भागात अलीकडेच नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले. त्यामुळे सुरक्षा दलांच्या नियोजनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नक्षलवाद्यांच्या घातपातानंतर जवानांचे वीरमरण देशभर कळायला चोवीस तास लागले. या लढाईत केंद्रीय राज्य पोलीस दलाच्या जवानांची संख्या होती दोन हजार, तर माओवाद्यांची संख्या होती केवळ 400. तरीही एकतर्फी वाटणाऱया लढाईत सरशी झाली ती माओवाद्यांची. असे वारंवार का घडते? चूक नेमकी कुठे होते आहे, यावर मंथन होणे आवश्यक आहे.

बस्तरमध्ये माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांचे जे ताजे हत्याकांड घडवले त्यामुळे माओवादीविरोधी अभियानातील दोष आणि उणिवा यावर पुन्हा चर्चा झडताना दिसते आहे. पण त्यावर केवळ चर्चाच न होता सुरक्षा दलांचे डावपेच बदलणेही आता तितकेच आवश्यक झाले आहे. वास्तविक बस्तरमधील नक्षल्यांच्या हालचालींची गुप्त माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी रणनीती आखली त्यासाठी यंत्रणेचे कौतुक केले पाहिजे. मात्र गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या ठिकाणी गेल्यावर तेथे माओवादी न दिसल्यावर, वाटेतली दोन गावे रिकामी दिसल्यावर घात होऊ शकतो, असा संशय यायला हवा होता. वरिष्ठ अधिकाऱयांचे तरी अशा हालचालींवर, संशयास्पद बाबींवर लक्ष होते का? असे काही होईल अशा प्रकारचे कंटिन्जन्सी प्लॅनिंग (Contingency planning) त्यांनी कधी केले होते का? हे हत्याकांड घनदाट जंगलात नव्हे तर सीआरपीएफच्या छावणीपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर झाले आहे. असे का?

चुकीचे लष्करी डावपेच

सुरक्षा दलांवर झालेला हल्ला हा दुपारी दोन ते चारच्या मध्ये झाला होता. हिंदुस्थानी सैन्य आपली ऑपरेशन्स ही केवळ रात्रीच्या वेळेला करते. कारण दिवसाच्या वेळेला आपल्या हालचालीवर शत्रू म्हणजेच दहशतवादी/माओवादी लक्ष ठेवून असतात. म्हणून आपल्याला अतिशय काळजीपूर्वक रात्रीच्या वेळेला ऑपरेशन्स करावी लागतात. माओवादीविरोधी अभियान पुनः पुन्हा दिवसाच्या वेळेला केले जाते, जे लष्करी डावपेचाच्या दृष्टीने चुकीचे आहे. त्यामुळे सुरक्षा दलांवर मोठय़ा हल्ल्यांसाठी इतर राज्यांतील माओवादी एकत्र येतात हे यापूर्वीही दिसले आहे. त्यांनी एकत्रित हल्ला करू नये म्हणून काय केले?

मारल्या गेलेल्या आणि जखमी झालेल्या अर्धसैनिक दलांमध्ये एकसुद्धा अधिकारी नव्हता. याचा अर्थ अधिकारी मागे लपून बसलेले होते का? बहुतेक ऑपरेशन्समध्ये कंपनी लेव्हलचे नेतृत्व हे हवालदार किंवा इन्स्पेक्टरकडून केले जाते. अधिकारी नेतृत्व कंपनीचे असो की बटालियनचे की त्यावरचे, हे लढाईमध्ये खरोखर कधीच भाग घेताना का दिसत नाही?

लढण्याची इच्छाशक्ती नसणे

ज्या वेळेला दोन हजार सैनिक एखादे मोठे ऑपरेशन  हाती घेतात तेव्हा त्यांच्या मदतीला वेगवेगळय़ा ठिकाणी इतर रिझर्व्ह तुकडय़ा तैनात असतात. 24 तासांच्या आधी त्या मदतीकरिता का आल्या नाहीत? मदत करणारी पथके तिथे लढाईत मदत करायला का पोहोचली नाहीत? ही पथके तिथे जायला घाबरत होती का? जेव्हा त्या भागातून माओवादी पूर्णपणे गेले ही बातमी मिळाली त्यानंतरच मदत पथके तिथे पोहचली. असे नेहमीच का होते? कारण लढण्याची इच्छाशक्ती नसणे. याची चौकशी नक्कीच केली जावी.

उच्च नेतृत्वावर किती विश्वास आहे ?

वेगवेगळ्य़ा दलांचे सैनिक ज्या वेळेला ऑपरेशन्स करत होते त्या वेळेला त्यांच्यावरचे नेतृत्व करणारे नेमके कुठे होते? वरच्या पोलीस नेतृत्वाचा जमिनीवर काम करणाऱया सैनिकांशी फारसा संबंध नसतो. खरे तर जमिनीवर लढणाऱया सैनिकांचे मनोबल उच्च दर्जाला नेणे हे नेतृत्वाचे काम असते. या अभियानात त्याचाच नेमका अभाव दिसला. आपण केवळ बळीचे बकरे बनवले जात आहोत, अशी भावना सैनिकांच्या मनात होती का? मीडियात आलेल्या रिपोर्टप्रमाणे नक्कीच होती. म्हणजेच लढणाऱया सैनिकांचा आपल्या नेतृत्वावर फारसा विश्वास नव्हता. अशा प्रकारच्या लढाईमध्ये केवळ संख्याबळ हे महत्त्वाचे नसते. यामध्ये युद्धनेतृत्व, सैनिकांची लढण्याची क्षमता आणि लढण्याची इच्छाशक्तीही महत्त्वाची असते. 400 माओवाद्यांचे मनोबल, लढण्याची इच्छाशक्ती आणि नेतृत्व हे दोन हजार अर्धसैनिक दलापेक्षा सगळ्य़ाच बाबतीमध्ये सरस होते.

काही वर्षांपूर्वी दंतेवाडामध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 76 सीआरपीएफच्या जवानांची हत्या झाली होती. त्यावेळी झालेल्या चौकशीमध्ये तिथल्या डीआयजी स्तराच्या अधिकाऱयाला दोषी ठरवण्यात आले होते. मात्र त्याच्याविरुद्ध कधीही कारवाई करण्यात आली नाही. उलट ते आताच झालेल्या हल्ल्यामध्ये आयजी ऑपरेशन्सच्या बढतीवर काम करत होते. या हल्ल्याच्या/कारवाईच्या नियोजनामध्येही त्यांचाच सहभाग होता आणि त्याचे नियोजन किती चुकीचे होते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

दिल्लीमध्ये राहून काही वेळेपुरते हेलिकॉप्टरने माओग्रस्त भागात येणाऱया अधिकाऱयांना जमिनीवर माओवादीविरोधी अभियान कसे करायचे याचे फारसे ज्ञान नसते. त्यांची अवस्था उंटावरून शेळ्य़ा हाकणाऱयासारखी असते, ज्यामुळे अर्धसैनिक दलाचे पुनः पुन्हा नुकसान होत आहे. असे मानले जाते की कंपनी, बटालियन लेव्हलवर होणाऱया ऑपरेशनमध्ये अर्धसैनिक दलाचे डायरेक्टली निवड झालेले अधिकारी जास्त चांगले नियोजन करू शकतात. त्यांचा इथे वापर करण्यात यावा.

सखोल विश्लेषण हवे

एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जर ‘सीआरपीएफ’च्या जवानांचे प्राण जात असतील तर ‘सीआरपीएफ’च्या अधिकाऱयांना व त्यांचे देशाच्या स्तरावर काम करणाऱया अधिकाऱयांना व नोकरशाहीला कोण जबाबदार, हे प्रश्न विचारणे आणि सुधारणा करणे गरजेचे आहे. जम्मू-कश्मीरमध्ये, ईशान्य हिंदुस्थानात कार्यरत हिंदुस्थानी सैन्यालाही दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागतो. मात्र सैन्याच्या तुकडय़ांना घेरून दहशतवादी हल्ला करूच शकत नाहीत. माओवादाविरोधात लढणाऱया ‘सीआरपीएफ’, पोलीस दले आणि अन्य सुरक्षा दलांच्या कार्यशैलीचे सखोल विश्लेषण सैनिकी तज्ञांमार्फत करणे आणि त्यात आवश्यक ते बदल घडविणे आता अत्यंत गरजेचे आहे. परवाच्या हल्ल्यामागे पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीच्या पहिल्या बटालियनचा नेता हिडमा याचा खात्मा हे आता सुरक्षा दलांचे प्रथम लक्ष्य असले पाहिजे. माओवाद्यांच्या उतरंडीमध्ये सर्वात वर पॉलिट ब्युरो आहे, त्याच्या हाताखाली सेंट्रल कमिटी आहे, त्याच्या खाली चार रिजनल कमिशन आहेत. याशिवाय संस्थात्मक दृष्टीने त्यांच्या अनेक कमिटी असतात. लढण्याकरिता सर्वात खालच्या स्तरावर दलम, नंतर कंपनी आणि बटालियन ही रचना असते. अर्थातच या सगळ्य़ांचे नेतृत्व नष्ट करणे हे सुरक्षा दलांचे सर्वात पहिले लक्ष्य असावे. त्यांचा खात्मा कमांडो रेड, सर्जिकल स्ट्राइक, छोटय़ा टोळ्य़ांच्या (small teams)मदतीने करावा लागेल. त्याकरिता स्पेशल फोर्सेसचा पण वापर करण्यात यावा.

अजून काय करावे?

लढण्याची क्षमता वाढविण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्या पर्यायामध्ये अर्धसैनिक दलामध्ये सैन्यातून अतिशय तरुणपणी निवृत्त झालेले सैनिक पाठवावेत, ज्यांची लढण्याची क्षमता आणि अनुभव प्रचंड असतो. त्यांचे नेतृत्व करण्याकरिता शॉर्ट सर्व्हिस कमिशननंतर रिटायर्ड झालेल्या अधिकाऱयांना अर्धसैनिक दलामध्ये अधिकारी बनवले जाऊ शकते.

या पर्यायाचा वापर केला तर यश मिळण्याकरिता वेळ लागू शकतो. मात्र जर लवकर माओवाद्यांचा खात्मा करायचा असेल तर हे काम हिंदुस्थानी सैन्याकडे द्यावे. त्यांचा एका वर्षात खात्मा करता येईल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या