
>>ब्रिगेडियर हेमंत महाजन
अनेक थोर पुरुषांची प्रेरणा ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या मंत्रात आहे. आज देशासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत. इतिहास हा गतकाळाचा साक्षीदार, भावी काळाचा वाटाडय़ा असतो. जे राष्ट्र इतिहासापासून शिकत नाही ते कधीही महासत्ता बनू शकत नाही. शिवरायांच्या असंख्य गुणांपैकी किती देशाच्या लोकप्रकृतीमध्ये उतरले हे महत्त्वाचे आहे. नरदुर्ग म्हणजे किल्ल्यासारखी बुलंद, मजबूत, शूर, निष्ठावान, पराक्रमी माणसे महाराजांनी बनवली.
आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथील छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्रात मध्यंतरी ‘शिवाजी महाराज राज्य कारभार, आधुनिक भारतासाठी धडे’ (Shivaji Maharaj State Craft, Lessons For Modern India) हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादांमध्ये 25 वेगवेगळ्या विषयांतील तज्ञांनी भाग घेतला. त्यात मीही होतो. ‘शिवाजी महाराजांची रणनीती, युद्धाचे डावपेच आणि गनिमी कावा’ या विषयावरचा माझा शोध निबंध मी सादर केला आहे. शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन आणि करप्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, स्त्रियांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, आयुध व्यवस्थापन आणि नौदल या वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद झाला.
शिवाजी राजांच्या वेळचे शत्रू होते मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, देशाच्या आतले देशद्रोही आणि आजचे देशाचे शत्रू आहेत चीन-पाकिस्तान, बांगलादेश, दहशतवादी, माओवादी आणि त्यांचे आतले देशद्रोही हस्तक. सर्व शाहय़ांचे सैन्य हे त्यावेळचे सर्वात सामर्थ्यवान सैन्य होते. मोगल सैन्य एक हलते शहर होते, कुटुंबाचे काबिले, बाजारबुणगे, बिनलढाऊ सैनिक, रसद पुरवणारे या सैन्याचा भाग होते. घोडय़ांची रसद 6 कि. ग्रॅम, सैनिकांची रसद 2 कि. ग्रॅम. प्रति दिवस असायची. यामुळे बाजारबुणग्यांची संख्या सैनिकांच्या पाचपट जास्त होती. तोफखान्याकरिता रस्ते, हत्ती, घोडे, उंट लागायचे. सैन्याचा चालण्याचा वेग दिवसाला 30 कि. मी. होता. आठवडय़ाला दोन विश्रांतीचे दिवस असायचे.
शिवाजी महाराजांचे सैन्य
शिवाजी महाराजांच्या सैन्याची सुरुवात 3-4 हजार सैनिकांनी झाली. राज्याभिषेकाच्या वेळी 45 हजार बारगीर, 60 हजार शिलेदार, एकूण 10 हजार 500 घोडदळ होते, पायदळ 60 हजार होते. पायदल चपळ, काटक आणि अतिशय जलदगतीने हालचाल करणारे होते. महाराजांचे अंगरक्षक दोन हजार अतिकुशल, शूर मावळे होते. सैन्यात वेगावर मर्यादा येतील असे काही नव्हते. बाजारबुणग्यांना थारा नव्हता. ते लांब लांब मजल सहज मारीत असे. अचानक हालचाली करू शकत.
युद्धाच्या वेळी नांगर सोडून प्रत्येक नागरिक शस्त्र्ा हाती घ्यायचे, सर्व सैनिक, गुप्तहेर कामसुद्धा करायचे. तलवारी आणि भाले मुख्य शस्त्र्ाs होती. तोफखान्यामुळे सैनिकांची हालचाल करण्याचा वेग हा कमी व्हायचा. तोफखान्याचा वापर फक्त किल्ल्यावर आणि नौदलाच्या बोटींवर केला जात होता. किल्ल्यांचे मुख्य काम आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे होते. शत्रूंच्या किल्ल्यांवर लक्ष ठेवण्याकरिता किल्ले, महत्त्वाच्या ठिकाणी किल्ले बांधले गेले होते. किल्ल्यांकरिता तटबंदी, मनोरे, वॉच टॉवर, खंदक, एक रस्ता, बालेकिल्ला असायचा. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचा वापर आक्रमक गनिमी काव्याकरिता केला.
शिवाजी महाराज आणि गनिमी कावा
मोगलांवर वेगवेगळ्या दिशेने अचानक हल्ले, कधी समोरून, कधी मागून, शत्रूंच्या कमजोर भागांवर हल्ले, शत्रू बेसावध असताना हल्ले, शत्रूच्या रसद पुरवणाऱ्या रस्त्यांवर हल्ले, छोटय़ा टोळ्यांमध्ये हारकत, आजूबाजूला असलेल्या भागावरच आपला गुजारा, आजूबाजूच्या नागरिकांची मदत गनिमी काव्याचा चांगला वापर केला जायचा. गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक/ जाधव होते. महाराजांचे गुप्तहेर खाते अतिउच्च दर्जाचे होते, ज्यामुळे अनेक युद्धामध्ये विजय मिळाला. शाहिस्तेखानावर हल्ला, सुरतवर हल्ला-नेमक्या गुप्तहेर माहितीमुळे शक्य झाला. महाराज स्वतः गुप्तहेर खात्यावर आपली नजर ठेवून असायचे.
सामरिक तज्ञ
एका वेळेस फक्त एकाच शत्रूशी लढाई, इतर शत्रूंशी समेट. कधी शत्रूंपासून रक्षण, कधी हल्ले, सामरिक खोलीकरिता आदिलशाहीवर हल्ले, मुघलांना सह्याद्री पर्वतरांगांत यायला भाग पाडणे अशी शिवाजी महाराजांची सामरिक युद्धनीती होती. वेगवेगळ्या ठिकाणचे सैन्य नेमके हल्ल्यांच्या वेळेला एका ठिकाणी आणायचे, किल्ल्यांचा वापर एक सुरक्षित स्थान म्हणून करायचा अशी त्यांची नीती होती. शिवाजी महाराज हे एक लष्करी प्रतिभावंत होते, ज्यांनी युद्ध लढण्याची हिंदुस्थानी पद्धत विकसित केली आणि शत्रूंना हिंदुस्थानी शस्त्रांनी पराभूत केले.
अनेक थोर पुरुषांची प्रेरणा ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या मंत्रात आहे. या मंत्राची प्रेरणा आजही प्रेरणादायी आहे. आज देशासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत. इतिहास हा गतकाळाचा साक्षीदार, भावी काळाचा वाटाडय़ा असतो. जे राष्ट्र इतिहासापासून शिकत नाही ते कधीही महासत्ता बनू शकत नाही. शिवरायांच्या असंख्य गुणांपैकी किती देशाच्या लोकप्रकृतीमध्ये उतरले हे महत्त्वाचे आहे. नरदुर्ग म्हणजे किल्ल्यासारखी बुलंद, मजबूत, शूर, निष्ठावान, पराक्रमी माणसे महाराजांनी बनवली.
लढाईमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक सैनिक आणि त्याचे शौर्य असते. लढाई सैनिकांमुळे जिंकली जाते. प्रत्येकच लढाईमध्ये सैनिक कसे लढतात यावर हरणे आणि जिंकण्याचा फैसला होतो. शिवाजी महाराजांनी धोकादायक परिस्थितीमध्ये सर्वात पुढे लढाई करून सैनिकांचे नेतृत्व केले आणि त्यामुळेच मराठय़ांनी त्यावेळेला महापराक्रम गाजवला. शिवाजी महाराजांची पुढून नेतृत्व करायची परंपरा आजसुद्धा हिंदुस्थानी सैन्य चालवत आहे, ज्यामुळे चीन आणि पाकिस्तानला आपण धडा शिकवतो, परंतु त्याची किंमत आपल्याला आपल्या अधिकाऱयांचे रक्त सांडून करावी लागते.
हिंदुस्थानच्या इतिहासातून छत्रपती शिवराय, महाराष्ट्र आणि मराठे वगळल्यास केवळ पराजयच आणि पराजयच दिसतो. मराठा आणि मराठा धर्माने सतरावे आणि अठरावे शतक आपल्या पराक्रमाने गाजविले. शिवाजी महाराजांची युद्ध पद्धती, राज्यपद्धती आधुनिक हिंदुस्थानला आजसुद्धा योग्य मार्गावर जाण्यामध्ये मदत करू शकते.




























































