
>> देवेंद्र भगत
निष्ठावंत कडवट शिवसैनिक ते मुंबईचे महापौर असा प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांचा उत्तुंग जीवनप्रवास राहिला. केवळ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच एक शिवसैनिक ते महापौर अशी मजल आपण मारू शकलो, अशा शब्दांत विश्वनाथ महाडेश्वर हे नेहमी आपल्या भावना व्यक्त करीत असत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कुसबे या गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनि. कॉलेज, कसाल येथे त्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. रुईया महाविद्यालयातून पदवी संपादन केली. ते स्वतः खेळाडू असल्याने क्रीडा शिक्षक व्हायचे असे त्यांनी ठरवले होते. भारतीय क्रीडा मंडळ, वडाळा येथून बी.एड.चा (शारीरिक शिक्षण) अभ्यासक्रम पूर्ण करून सन 1986 मध्ये घाटकोपर येथील मल्टिपर्पज टेक्निकल हायस्कूल ऍण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये इंग्रजी आणि शारीरिक शिक्षणाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. त्या काळातील शिवसेनाप्रमुखांची भाषणे, धारदार वाणीने प्रभावित होऊन ते शिवसैनिक झाले. शाळेत अध्यापनाचे कार्य करीत असतानाच ते राहत असलेल्या खार, सांताक्रुझ (पूर्व) विभागात शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करू लागले. 1986 साली शिवसेना पक्षाचे उपशाखाप्रमुख, 1992 मध्ये शाखाप्रमुख आणि नंतर तीन वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी या विभागाचे प्रतिनिधित्व केले. पालिकेच्या विविध वैधानिक समित्यांवरही त्यांनी काम केले. यामध्ये 8 मार्च 2017 ते 21 नोव्हेंबर 2019 पर्यंत महापौरपदावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मुंबईसारख्या महानगरीचे शिवसेनेचे महापौर म्हणून त्यांना अनुभवायला मिळालेला काळ त्यांच्यासाठी अविस्मरणीय होता, असे ते नेहमी सांगत.
1991-92 च्या काळात खार-सांताक्रुझ पूर्व येथील झोपडपट्टी विभागातील विद्यार्थ्यांना दूर अंतरावर शाळेत जावे लागे. त्यामुळे बरेच विद्यार्थी शाळा अर्ध्यावर सोडत असत. परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना फार वाईट वाटे. शिक्षक हा समाज घडविणारा एक घटक असतो या नात्याने सामाजिक बांधिलकी ओळखून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 1994 मध्ये एक शिक्षण संस्था स्थापन केली. ते स्वतः प्रबोधनकारांच्या पुरोगामी विचारांचा आदर करणारे शिक्षक असल्यामुळे संस्थेचे नामकरण त्यांनी ‘प्रबोधन शिक्षण संस्था’ असे केले. काही दिवसांतच 1 जुलै 1994 रोजी शिवसेना नेते दिवंगत मधुकरराव सरपोतदार यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्याच शुभहस्ते ‘राजे संभाजी विद्यालय’ या नावाने मराठी माध्यमाची शाळा सुरू केली, तर 2002 पासून राजे संभाजी विद्यालय येथे ते प्रिंन्सिपॉल म्हणून कार्यरत झाले.
प्रिं. महाडेश्वर हे दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करण्याबाबत कायम आग्रही असत. आपल्या महापौरपदाच्या काळात प्रसारमाध्यमांशी बोलताना तर ते हटकून फक्त मराठी भाषेतच संवाद साधत असत. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांना प्रोत्साहन देण्याबरोबरच पालिकेच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढावा यावर महाडेश्वर यांनी विशेष भर दिला. अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या कारकीर्दीत त्यांनी नागरी सुविधांचे आणि मुंबईच्या विकासाचे अनेक प्रस्ताव मार्गी लावताना मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी केलेली विकासकामे सर्वसामान्य मुंबईकरांपर्यंत पोहोचावीत, त्यांना महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्याच काळात मुंबईची वाहतूककोंडी फोडणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी टॅब वाटप मोठय़ा प्रमाणात करण्यात आले. महापौर निधीतून मिळणारी पाच हजार रुपयांची मदत 25 हजारांपर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला. हुक्का पार्लरवर कारवाई झाली. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राजधान्यांच्या गटात स्वच्छ सर्वेक्षणाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुंबई शहराला मिळाला. महापौरपदी असताना दैनिक ‘लोकमत’कडून ‘पॉलिटिकल आयकॉन’ म्हणून सन्मानित करण्यात आले. कोरोना महासाथीमुळे सक्तीची गृहबंदी, सामाजिक अंतर असे निर्बंध सांभाळावे लागले. विभागातील लोकांसाठी औषधोपचार, इस्पितळांत सोय, जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा अशी कामे त्यांनी केली. शिवसेनेच्या अनेक आंदोलनांत ते कायम सक्रिय राहिले. त्यांच्या निधनाने एक आक्रमक आणि निष्ठावंत शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला आहे.




























































