
>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक
पावसाळय़ात ट्रेकिंग करणे हे जेवढे मजेचे तितकेच ते धोक्याचेही असते. निसर्गाच्या सहवासात जाताना त्याच्या नियमांप्रमाणेच वागायचे हे सर्व प्रथम लक्षात घ्यायला हवे.
पावसाळा सुरू झाला की हिरवा शालू ल्यालेल्या धरतीचे सौंदर्य काय वर्णावे. ग्रीष्माच्या तडाख्याने सैरभैर झालेली धरती पावसाचे टपोरे थेंब पडताच तृप्त होऊन जाते. चोहीकडे निसर्गसौंदर्याने सजलेल्या डोंगररांगांतून पांढऱ्याशुभ्र धबधब्यांना उधाण येते. नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागतात. त्यामुळे मुळातच रांगडी सौंदर्य असलेल्या सह्याद्रीचे देखणेपण पावसाळय़ात अजून खुलून येते. त्यामुळे पावसाळय़ात ट्रेकिंगची मजा काही औरच असते. पावसाळय़ात ट्रेकिंग करणे हे जेवढे मजेचे तितकेच ते धोक्याचेही असते. सध्या वीकेण्ड येताच तरुणाईसह वयस्कर मंडळीची पावलेसुद्धा डोंगरदऱ्यात वळू लागलीत. आजमितीस वीकेण्डला सिंहगड, लोहगड, राजगड, राजमाची, कळसुबाई, हरिहरगड, भुशी डॅम, ताम्हिणी घाट, सांधण दरी, देवकुंड या प्रसिद्ध पावसाळी पर्यटनस्थळी लोक हजारोंच्या संख्येने गर्दी करतात. गेल्या रविवारी लोहगडावर पर्यटक तब्बल चार तास गडावर झालेल्या कोंडीत अडकले होते. भुशी डॅम, ताम्हिणी घाट, सिंहगड घाट, माळशेज घाटातही तीच परिस्थिती. यामुळे पावसाळय़ात बऱ्याचदा भटकंतीच्या आनंदापेक्षा निराशाच आपल्या पदरी पडते. त्यामुळे शक्य असेल तर शनिवार, रविवार सोडून भटकंती करावी.
किल्ला, धबधबा, जंगल वा काससारखे पठार येथे क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक त्या ठिकाणी गेल्यास तेथील नैसर्गिक साधनांवर ताण येतो. त्यामुळे पावसाळय़ात सुट्टीच्या दिवशी प्रसिद्ध ठिकाणी ठरावीक संख्येतच लोकांना प्रवेश दिला पाहिजे तरच निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येईल.
पावसाळय़ात ट्रेकिंग करताना शक्यतो सोप्या श्रेणीतले गडकिल्ले अथवा घाटवाटा निवडाव्यात. राजगड, रायगड, लोहगड, राजमाची, सिंहगड, हरिश्चंद्रगडसारखे गडकिल्ले पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी बरीच गर्दी असते. ती टाळायची असेल तर रोहिडा, चंदनवंदन, अंकाईटंकाई, वेताळवाडी, पट्टा, तळागड, अवचितगडसारख्या अनेक सुंदर गडकिल्ल्यांचा आपल्यासमोर पर्याय आहे. अलंग मदन कुलंग, हरिहर गड, गोरखगड, लिंगाणा, कलावंतीण, जीवधन, भैरवगड, पदरगडसारखे रॉक क्लाइंबिंग व साहसी चढाईचे किल्ले पावसाळय़ात आवर्जून टाळावेत. कारण या किल्ल्यांना कातळचढाई जास्त प्रमाणात आहे. निसरडय़ा वाटांमुळे तसेच रॉकपॅचवर शेवाळ साठल्यामुळे शक्यतो या अवघड गडकिल्ल्यांच्या वाटेला जाऊ नये.
निसर्गाच्या सहवासात जाताना त्याच्या नियमांप्रमाणेच वागायचे हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे, तरच पावसाळी ट्रेकिंग सुरक्षित व आनंददायी होऊ शकेल.
अनुभवी ग्रुपची साथ
पावसाळय़ात कधीही एकटय़ाने ट्रेकिंग करू नये. ट्रेकिंगला जाताना एखाद्या अनुभवी ट्रेकिंग ग्रुप- सोबत जाणे कधीही योग्य. आजकाल पैसे कमावण्याचे साधन म्हणून दोन-चार ट्रेक करणारे लोकसुद्धा नवीन ग्रुप काढू लागले आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. अशा ग्रुप्सवर शासनानेसुद्धा वचक ठेवणे गरजेचे आहे. बऱ्याचदा आपण जाणार असू त्या गडाच्या किंवा धबधब्याच्या वाटेत ओढे असतात. त्यातील पाण्याचा अंदाज घेऊनच किंवा स्थानिक लोकांना विचारून आपण योग्य जागी ते ओढे ओलांडावेत. काही वेळा जाताना या ठिकाणी पाणी कमी असते. मात्र ऐनवेळी पडलेल्या पावसामुळे कधीही हे ओढे, नाले धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागतात. अशा वेळी पाणी ओसरण्याची वाट बघणे हिताचे असते.
खबरदारी घ्या
पावसाळय़ात ट्रेकिंगला कधीही हलक्यात घेऊ नये. निसरडय़ा वाटांवर शक्यतो हातात काठी असावी. दाट गवतातून मार्ग काढण्यासाठी व साप व इतर कीटकांपासून बचाव होण्यासाठीसुद्धा काठीची मदत होते. कधी दाट धुक्यामुळे वाट चुकण्याची भीती असते. त्यामुळे अपरिचित ठिकाणी नेहमी आपल्यासोबत एखादा स्थानिक गाइड घ्यावा. स्वतःहून नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न कधीही करू नये. फोटो काढतानाही योग्य ती खबरदारी घ्यावी.



























































