पंजाबमधील महिलांना दरमहा मिळणार १,००० रुपये, दिल्लीत मोफत वीज बंद होत आहे; अरविंद केजरीवाल यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंजाब सरकारच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री मावा-धिया सत्कार योजना (Mukhya Mantri Mawan Dhiyan Satkar Yojana) जाहीर करण्यात आली असून, यांतर्गत राज्यातील १८ वर्षांवरील पात्र महिलांना दरमहा १,००० रुपये दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे अनुसूचित जातीतील (SC) महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातील.

विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने पंजाबमधील महिलांना दरमहा १,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी पंजाब सरकारने अर्थसंकल्पात ९,३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेचा लाभ पंजाबमधील सुमारे ९७ टक्के महिलांना मिळणार असून, ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. वित्तमंत्री हरपाल सिंह चीमा यांनी सांगितले की, १ एप्रिलपासून या योजनेसाठी नावनोंदणी करणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळेल.

दिल्लीतील मोफत वीज योजनेबाबत काय म्हणाले केजरीवाल?

पंजाबमध्ये योजना लागू करत असतानाच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल झाला असून, आता तेथे भाजपचे सरकार आले आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी असा दावा केला आहे की, दिल्लीतील जनतेला मिळणारी मोफत वीज आता बंद केली जात आहे.

केजरीवाल म्हणाले की, “आम्ही दिल्लीत २०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली होती, ज्यामुळे लाखो कुटुंबांचे वीज बिल शून्य येत होते. परंतु आता दिल्लीत भाजपचे सरकार आल्यामुळे ही सवलत बंद होण्याच्या मार्गावर आहे.”