
अमली पदार्थ प्रकरणी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाची (एनसीबी) कोठडी सुनावली आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट, मुनमुन धमीजा, विक्रांत छोकर, इसमीत सिंह, नूपुर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
आर्यन खानसह आठ जणांविरुध्द अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे गुन्हे अजामीनपात्र आहेत. आरोपी आणि सहआरोपींनी चौकशीत दिलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याने याप्रकरणी अधिक चौकशीची गरज असल्याचे सांगत न्यायालयाने त्यांना एनसीबी कोठडी सुनावली. आर्यन खानच्या वतीने ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात युक्तिवाद करत जामिनाची मागणी केली होती. परंतु ती न्यायालयाने फेटाळून लावली.
चौकशीपूर्वी पुन्हा होणार वैद्यकीय चाचणी
एनसीबीकडून आरोपींची चौकशी सुरू करण्यापूर्वी त्यांची पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास त्यांना घटनास्थळीही नेऊन चौकशी केली जाईल. त्याचप्रमाणे जप्तीची कारवाईही होऊ शकते असे एनसीबीतील सूत्रांनी सांगितले.
कॉर्डेलिया क्रूझवरील 6 कर्मचाऱयांचीही चौकशी
एनसीबीच्या पथकाने मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलवर उभ्या असलेल्या कॉर्डेलिया क्रूझवर आज पुन्हा छापा टाकला. तिथे एनसीबीला अंमली पदार्थ सापडले. क्रूझवरील 6 कर्मचाऱयांना त्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आर्यनच्या मोबाईमधील चॅट्समधून या कर्मचाऱयांची नावे समोर आली. दरम्यान याप्रकरणी जुहू आणि गोरेगावमधून दोन जणांना रविवारी रात्री अटक करण्यात आली.
न्यायालयातील युक्तिवाद
अॅड. सतीश मानेशिंदे
आर्यन हा अधिकार म्हणून जामीन मागत नाही. त्याला क्रूझवर अटक करण्यात आली नव्हती हे सत्य आहे. तिथे त्याला स्पेशल गेस्ट म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. एका मित्राबरोबर तो तिथे गेला होता. क्रूझवरील कोणते केबिन त्याच्यासाठी बुक होते हेसुध्दा त्याला माहीत नव्हते. क्रूझवर जाण्यासाठी त्याने एक पैसाही दिला नव्हता आणि तो कोणत्याही आयोजकांना ओळखत नव्हता. पंचनाम्यामध्ये त्याच्याकडून मोबाईल फोनशिवाय काहीच जप्त केले गेले नाही असे नमूद आहे. त्याच्या मित्राकडे 6 ग्रॅम चरस सापडल्याने त्याला अटक करण्यात आली. त्या प्रकरणाशी आर्यनचा काहीच संबंध नाही. कोठडी मागण्यासाठी जी जप्ती दाखवली गेली आहे त्यापैकी आर्यनकडे काहीच सापडलेले नाही. ती जप्ती अन्य आरोपींकडून केली गेली आणि त्याच्याशी आर्यनचा संबंध जोडला गेला. चौकशीवेळी त्याचे व्हॉट्सअॅप चॅट डाऊनलोड केले गेले. आता तर तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी जोडला गेला असल्याचा दावा केला जात आहे. त्याचा कोणत्याही ड्रग वाहतूक, पुरवठा आणि वितरणाशी संबंध नाही. त्याचे चॅट्स, डाऊनलोड्स, फोटो किंवा अन्य कोणत्याही वस्तूवरून त्याचा या ड्रग्ज पार्टीशी संबंध असल्याचे सिध्द होत नाही. ड्रग्जसंदर्भात त्याचे कोणाशी बोलणे झाले असेल तर त्याचा संबंध ड्रग तस्करीशी जोडला जाऊ शकत नाही. रिया चक्रवर्ती प्रकरणातही कलम ‘27 ए’ हटवण्यात आले होते. त्यामुळे आर्यनला कोठडीऐवजी जामीन दिला जावा. जप्तीची आता गरज नाही आणि त्यासाठी कोठडीत ठेवण्यातही काहीच अर्थ नाही.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल
आम्ही कोठडीसाठी अर्ज केला आहे. तत्पूर्वी जामीन कसा मागितला जाऊ शकतो. आरोपी आर्यन हा निमंत्रण आल्यानंतरच क्रूझवर गेला होता. क्रूझवर ड्रग्ज जप्त करण्यात आलेल्या लोकांसोबत तो उपस्थित होता. त्याची आणि इतरांची अमली पदार्थांबद्दल चर्चा होत होती. या सर्व गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे. आर्यनचे अज्ञात व्यक्तींबरोबर मोबाईल चॅट आहेत. त्यात ड्रग्सच्या खरेदीबद्दलही उल्लेख आहे. यावरून त्याचे इतरांशी काही ना काही संबंध होते आणि तो त्यांच्या संपर्कात होता हे स्पष्ट होते. सध्या या प्रकरणाची चौकशी प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे जामिनाचा विचार न करता जास्तीत जास्त कोठडी देण्याचा विचार केला जावा.
ड्रग्ज खरेदीविक्रीचे आर्यनचे प्लॅनिंग
आर्यन खान याच्या मोबाईल फोनमध्ये बरीच माहिती सापडली आहे. तो ड्रग्ज खरेदी-विक्री करण्याचा विचार करत होता. त्याचे अनोळखी व्यक्तीसोबत गांजाबाबत बोलणे झाले होते अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. त्यांनी आर्यनचे चॅट्सही न्यायालयात सादर केले. अरबाज आणि मुनमुन यांना न्यायालयात नेण्यापूर्वी सर जे. जे. रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी केली गेली.
शाहरुखच्या बंगल्यावरही पडणार छापा
ड्रग्ज पार्टीप्रकरणी शाहरुख खान याच्या बंगल्यावरही एनसीबी छापा टापू शकते. कारण अमली पदार्थ प्रकरणात अटक झालेल्या आरोपीच्या घराची झडती घेण्याची तरतूद एनडीपीएस कायद्यामध्ये आहे.
डॅड! आय अॅम इनोसन्ट
अटक झाल्यानंतर आर्यनने आपला पिता शाहरूखबरोबर फोनवरून बोलणे केले. कायदेशीर प्रक्रियेनुसार एनसीबी कार्यालयातील लॅन्डलाईन फोनवरून आर्यनचे शाहरुखशी बोलणे करून देण्यात आले. दोन मिनिटे ते बोलत होते. शाहरुखशी बोलताना आर्यन ढसाढसा रडत होता. ‘मी निष्पाप आहे’ असे सांगत होता.
त्याच क्रूझवर पुन्हा धाड; मोठा ड्रग्जसाठा सापडला
एनसीबीने सोमवारी पुन्हा त्याच क्रूझवर धाड टाकली. त्यात मोठा ड्रग्जसाठा सापडला. एनसीबीने क्रूझच्या सहा कर्मचाऱयांना ताब्यात घेतले असून त्यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
जोगेश्वरीतून ड्रग्ज सप्लायरला अटक करण्यात आली. त्याच्याकडे पाच लाखांचे एमडी सापडले. जुहू येथूनही एनसीबीने एकाला उचलले.
आर्यनला वाटले तर क्रूझ विकत घेऊ शकतो
आर्यन खानला न्यायालयात सादर केल्यानंतर त्याचे वकील सतीश मानेशिंदे आणि सरकारी वकिलांमध्ये युक्तिवाद झाला. आर्यनची कोठडी का हवी आहे? असा सवाल करत मानेशिंदे यांनी त्याच्या कोठडीला विरोध केला. त्यावर आर्यनला क्रूझवरील पार्टीमध्ये का बोलवण्यात आले होते? कोणी बोलवले होते? यासह अनेक गोष्टींची उकल अद्याप झाली नसल्याने चौकशीची गरज असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. अॅड. मानेशिंदे यांनी त्याला आक्षेप घेतला. ‘आर्यनला वाटले तर तो संपूर्ण क्रूझ विकत घेऊ शकतो. त्याला क्रूझवर जाऊन ड्रग्ज विकण्याची गरज नाही आणि तो क्रूझवर का गेला होता याच्याशी एनसीबीचा संबंध नाही’ असे मानेशिंदे म्हणाले.
































































