तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही, आशीष शेलार यांचा राज ठाकरेंना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केल्यास तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे.

राज ठाकरे यांनी दोन हजारच्या नोटाबंदीवर टीका करताना ही धरसोडवृत्ती असून असे सरकार चालवतात का, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले, सगळय़ाच बाबतीत तुम्ही बोलले पाहिजे आणि तुम्ही बोललेले खरेच असेल असे मानण्याचे कारण नाही. तुम्ही आमच्यावर व्यक्तिगत टीका केलीत तर आम्ही उत्तर देणार नाही, मात्र पक्ष व नेतृत्वावर टीका केलीत तर खपवून घेणार नाही, असे शेलार यांनी राज ठाकरे यांना सुनावले.

दोन हजारांच्या नोटांवरची बंदी ही धरसोडवृत्ती नसून जे सुटलेले आहेत त्यांना धरण्याचा हा कार्यक्रम आहे. आरबीआयच्या धोरणानुसार हा निर्णय घेतला आहे. तुमच्या गावात तरी हा विषय आहे का? मोदींच्या निर्णयानंतर आता लगेच काही लोक बोलायला लागले आहेत, असे शेलार म्हणाले.