
सामना प्रतिनिधी । आष्टी
गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या आष्टीकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. धरणे कोरडेठाक पडले होते. त्यामुळे तालुक्यात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली होती, कुकडीचे पाणी सीन धरणात सोडल्याने आष्टी तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.
तालुक्यातील नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या मेहकरी प्रकल्पातील पाणीसाठा संपल्याने जनता आता सीना प्रकल्पावर अवलंबून आहे. आष्टी तालुक्यात दुष्काळाच्या झळा सर्वत्र निर्माण झाल्या असून तालुक्यातील सर्व तलावातील पाणी संपले आहे. पण आता आष्टी तालुक्याला सीना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणार असून शनिवार सायंकाळी ६ वाजता कुकडीचे पाणी सीना धरणात दाखल झाले आहे. या पाण्याचा लाभ आष्टी तालुक्याला होणार आहे. सीना धरणाच्या पाण्याची पाहणी आष्टीचे तहसीलदार हिरामण झिरवाळ, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सुनिल कुलकर्णी, पंचायत समितिच्या पाणी पुरवठा विभागाचे धेंडे यांनी केली.

































































