क्रिकेटमध्ये सुवर्ण, हिंदुस्थानी संघाचा चीनमध्ये डॉटर्स डे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेचा सोमवारचा दिवस हिंदुस्थानी महिला क्रिकेटसाठी सोनियाचा दिन ठरला. सुवर्ण पदकासाठी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत हिंदुस्थानी संघाने श्रीलंकन महिला संघासमोर 117 धावांचे आव्हान उभारले होते, पण लंकेचा संघ 20 षटकांत 8 बाद 97 धावाच करू शकला आणि हिंदुस्थानने 19 धावांच्या विजयासह आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचे पहिलेवहिले सुवर्ण पदक जिंकत आपला डॉटर्स डे चीनमध्ये साजरा केला. हिंदुस्थानने प्रथमच क्रिकेट प्रकारात आपले दोन्ही संघ पाठविले होते. कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला हरवत बाजी मारली.

हिंदुस्थानच्या महिलांनी उभारलेल्या आव्हानचा पाठलाग करताना तितास साधूने आपल्या दुसऱ्या षटकांत 3 चेंडूंत 2 तर तिसऱ्या षटकांत चामरी अटापट्टूला बाद करून लंकेची 3 बाद 14 अशी दयनीय अवस्था केली. हसीनी परेरा, नीलाक्षी डीसिल्व्हा, ओशाडी रनसिंघे यांनी जबाबदारीने खेळ करत श्रीलंकेचे आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण यानंतर लंकेचा डाव कुणीही सावरू शकला नाही आणि लंकेच्या पराभवाची औपचारिकताच केवळ उरली. अखेर ते पूर्ण 20 षटके खेळूनही शंभरीपलीकडेही पोहचू शकले नाहीत. साधूने 4 षटकांत केवळ 6 धावांत देत 3 विकेट घेत जबरदस्त कामगिरी केली तर राजेश्वरी गायकवाडने 2 विकेट टिपल्या.

बांगलादेशला कांस्य

आशियाई स्पर्धेत 2010 साली सर्वप्रथम क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर 2014 सालीही क्रिकेट होते, पण त्यानंतर 2018 साली क्रिकेटचा स्पर्धेत समावेश करण्यात आला नव्हता. 2022 साली त्याचे पुन्हा आशियाई क्रीडा स्पर्धेत पुनरागमन झाले. महिलांच्या पहिल्या दोन्ही स्पर्धा पाकिस्तानने जिंकल्या होत्या. मात्र यावेळी त्यांना कांस्य पदकही जिंकता आले नाही. पाकिस्तानच्या महिला 20 षटकांत 9 बाद 64 धावाच करू शकल्या तर बांगलादेशने 18.2 षटकांत 5 विकेट गमावत आपले कांस्य जिंकले. बांगलादेशचा महिला गेल्या दोन्ही स्पर्धात रौप्य पदकाच्या मानकरी ठरल्या होत्या. पुरूषांच्या गटात पहिले सुवर्ण बांगलादेशने तर दुसरे श्रीलंकेने जिंकले होते. या दोन्ही स्पर्धात अफगाणिस्तान उपविजेता म्हणजेच रौप्य विजेता ठरला होता.

राष्ट्रगीत वाजताच डोळ्यांत आनंदाश्रू आले – मानधना

आम्ही सुवर्ण पदक जिंकण्याचे ध्येय समोर ठेऊनच खेळत होतो आणि जिंकलोसुद्धा. जेव्हा राष्ट्रगीताची धून वाजली तेव्हा डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. हा क्षण माझ्यासाठी खूपच विशेष असल्याचे हिंदुस्थानच्या विजयाची शिल्पकार स्मृती मानधना म्हणाली. क्रिकेटमध्ये पहिलेवहिले सुवर्ण जिंकल्यानंतर हिंदुस्थानच्या सर्वच विजेतींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या ऐतिहासिक विजयानंतर मानधना म्हणाली, हा क्षण आमच्यासाठी स्पेशल आहे. आतापर्यंत आम्ही हे टीव्हीवर पाहिलं होतं, जेव्हा नीरज चोप्राने पदक जिंकलं होतं. आज तो क्षण प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला आणि राष्ट्रगीत वाजताच डोळे पाण्यांनी डबडबले. खरं सांगायचं तर पदक तालिकेत आम्ही आमचे सोनेरी योगदान देऊ शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही आमचं सर्वोत्तम खेळ दाखवू शकलो, याचाही आनंद झाल्याचे स्मृती मानधना म्हणाली.