खेलरत्न पुरस्कारानंतर आता राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यानाचं नाव बदललं, काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममधील हिमंत बिस्वा सरमा सरकारने ‘राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान’चे (Rajiv Gandhi Orang National Park) नाव बदलले आहे. आता या उद्यानाचे नाव ‘ओरांग राष्ट्रीय उद्यान’ (Orang National Park) असे असणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पूरस्कार राजीव ‘गांधी खेल रत्न पुरस्कारा’चे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ केले होते.

आसम सरकारचे प्रवक्ते आणि जलसंधारण मंत्री पियूष हजारिका यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. आदिवासी समाजाची मागणी विचारात घेते सरकारने राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान करण्याचा निर्णय घेतला आहे, असे हजारिका म्हणाले.

‘अपमानजनक निर्णय’

दरम्यान, आसाम सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली असून हे अपमानजनक पाऊल असल्याचे म्हटले आहे. आसामचे काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, फक्त आसामच नाही तर संपूर्ण देशात हे असेच होत आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा अपमान होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समर्थक या नेत्यांच्या योगदानाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या सर्वांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती, हे पंतप्रधान मोदींनी विसरू नये, असेही गोगोई म्हणाले. तर हा मूर्खपणात घेतलेला निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरमय्या यांनी दिली आहे.

उद्यानाची ओळख

ओरांग राष्ट्रीय उद्यान हे आसामच्या दरांग आणि सोनितपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेला आहे. एकूण 79.28 वर्ग किलोमीटरमध्ये हे राष्ट्रीय उद्यान पसरलेले आहे. 1985 मध्ये एक अभयारण्य म्हणून ते उदयास आले होते, मात्र 13 एप्रिल 1999 ला यास राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. या राष्ट्रीय उद्यानामध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, जीवजंतू आढळतात. तसेच गेंडे, पिग्ही हॉग, आशियाई हत्ती, जंगली म्हैस आणि वाघही या उद्यानात आहेत. हे राष्ट्रीय उद्यान विशेषत: गेंड्यांसाठी ओळखले जाते. या उद्यानात जवळपास 100 हून अधिक गेंडे असून 24 पेक्षा जास्त रॉयल बंगाल टायगर आहेत.