मुंबईकरांनो, दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडू नका! पारा 41 वर, तापमान आणखी वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. आज मुंबईत 35 अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदवले गेले. मात्र, उन्हाचे चटके आणि असह्य उकाडा यामुळे पारा 40 अंश सेल्सियसवर गेल्यासारखा अनुभव मुंबईकरांनी घेतला. आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक होते. त्यामुळे अंगातून अक्षरशः घामाच्या धारा वाहत होत्या.  पुढचे 48 तास तापमानात आणखी 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 4 यादरम्यान शक्यतो घराबाहेर पडू नये असे आवाहन हवामान विभागाने तसेच डॉक्टरांनी केले आहे.  दरम्यान, पुणे आणि मालेगाव येथे 41 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

कशामुळे वाढले तापमान?

मुंबईत वरळी, सांताक्रुझ येथे 35 अंश सेल्सियसची नोंद झाली. पुणे, मालेगाव येथे 41, तर अनेक ठिकाणी 38 ते 40 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, अशी माहिती हवामान विभागाने संकेतस्थळाच्या माध्यमातून जाहीर केली आहे. दरम्यान, गुजरात, राजस्थानकडून येणाऱया उष्ण वाऱयांमुळे तसेच अरबी समुद्र, हिंद महासगारातील पृष्ठभागाचे तापमान वाढल्यामुळे उष्ण वारे येत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.