एटीएम सेंटरमध्ये हातचलाखी; नागरिकांचे कार्ड, पिन घेऊन करायचा फसवणूक

एटीएम सेंटरमध्ये नागरिकांना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने त्यांचे कार्ड व पिन नंबर घेऊन फसवणूक करणारा भामटा घाटकोपर पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याकडे मोठय़ा प्रमाणात एटीएम कार्ड सापडले असून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तुफैल अहमद लालमिया सिद्धीकी (33) असे आरोपीचे नाव आहे. तुफैल हा एटिएम सेंटरमध्ये पैसे काढून देण्याच्या बहाण्याने संबंधितांचे एटिएम कार्ड व त्याचा पिन नंबर हातचलाखीने मिळवतो. तसेच संबंधितांना त्याच्या कार्डसारखे मिळतेजुळते कार्ड देतो. त्यानंतर हातचलाखीने मिळवलेल्या एटीएम कार्ड मधून पैसे काढतो. असे गुन्हे करणाऱया तुफैलची माहिती उपनिरीक्षक बावकर यांना मिळाली.

त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बावकर व पथकाने तुफैलची गठडी वळली. अशाप्रकारे विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबूली तुफैलने पोलिस चौकशीत दिली. विविध बँकेचे सुमारे 108 एटीएम कार्ड जप्त केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या