
सामना प्रतिनिधी । हिंगोली
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्याविरुध्द कळमनुरीचे काँग्रेस आमदार डॉ. संतोष टारफे यांनी फिर्याद देऊन अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज ५ डिसेंबर रोजी कळमनुरी व औंढा नागनाथ येथील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवसेनेच्या समर्थनार्थ हजारो नागरिक व शिवसैनिक रस्त्यावर उतरले. दरम्यान, जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या निषेधार्थ हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसने निषेध मोर्चा काढला. तर शिवसेनेने हिंगोली व सेनगाव येथे प्रशासनाला निवेदन देऊन जिल्हाप्रमुखांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली.
कळमनुरीचे काँग्रेस आमदार डॉ. संतोष टारफे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्याविरुध्द दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याच्या निषेधार्थ कळमनुरी व औंढा नागनाथ येथील व्यापाऱ्यांनी आज दिवसभर उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. औंढा नागनाथ येथे युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे, नगरसेवक श्रीराम बांगर, राम कदम, अनिल देशमुख, साहेबराव देशमुख, बंडु चोंढेकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक व हजारो नागरिकांनी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन दिले.
तर कळमनुरीमध्ये शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी बाजीराव सवंडकर, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, अजय सावंत, सखाराम उबाळे, रवी शिंदे, आर.आर. पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक व नागरिकांनी तहसील कार्यालयात जिल्हाप्रमुखांवरील गुन्हा मागे घ्यावा, अशा मागणीचे निवेदन दिले. हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख अशोक नाईक, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, कडुजी भंवर, भानुदास जाधव, आनंदराव जगताप, डॉ. रमेश शिंदे, गोपाल अग्रवाल, राजु अनमुलवार यांच्यासह शिवसैनिकांनी निवेदन देऊन आमदार संतोष टारफे यांचा निषेध करत खोटा गुन्हा मागे न घ्यावा, अशी मागणी केली. तर सेनगाव येथे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, तालुकाप्रमुख संतोष देवकर, प्रवीण महाजन, पिंटु देशमुख यांच्यासह कार्यकत्र्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
दरम्यान, काँग्रेस आमदार संतोष टारफे यांच्या आवाहनानुसार जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्याविरुध्द हिंगोलीत निषेध मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला.






























































