
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हय़ाच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या वाहनावर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी हल्ला केला आहे. सुदैवाने या हल्ल्यात रोहिणी यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या हल्ल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हल्लेखोरांकडे पिस्तुल आणि तलवारी अशी शस्त्रे होती. हल्ला कुणी केला हे माहीत असले तरी आता मी ते सांगणार नाही. पोलीस तपासात खरी माहिती समोर येईल असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. सध्या मी प्रवासात असून या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रोहिणी खडसेच पोलिसांकडे तक्रार दाखल करतील असेही खडसे यांनी सांगितले. या हल्ल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना माहिती दिल्याचेही खडसे म्हणाले.


































































