
बिहारची राजधानी पाटण्यात अतिक्रमण हटवायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यात शहराचे एसपी अमरीश राहुल यांच्यासह अनेक पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
राजीव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेपाळी नगरमधील 70 घरांवर कारवाई करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीक्र संताप आहे. पोलिसांनी सांगितले की, अतिक्रमण करते वेळी स्थानिकांनी घराच्या छतावरून दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ांचा वापर करावा लागला.
जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले की, अतिक्रमणाची कारवाई सुरूच राहणार आहे. आम्ही कोणत्याही स्थितीत जमीन आमच्या ताब्यात घेऊ. दरम्यान, पोलिसांवर हल्ला करणाऱया 12 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजवरून उर्वरित हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
नेमकं काय प्रकरण आहे?
राजीव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेपाळी नगर परिसरात बेकायदेशीरपणे बांधलेली 70 घरे पाडण्याचे काम सुरू आहे. ही सर्व 70 घरे गृहनिर्माण मंडळाच्या जमिनीवर बांधण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या सर्व लोकांना यापूर्वीच अनेक नोटिसा पाठवल्या होत्या. त्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण लोक अतिक्रमण हटवण्यास तयार न झाल्यामुळे ही कारवाई करावी लागली.





























































