विरोधी विचारांच्या लोकांना शहरी नक्षली ठरवण्याचा डाव, शरद पवार यांचा हल्ला

‘राज्य शासनाकडून विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षली असल्याचे शिक्के मारले जात आहेत. तसेच त्यांच्या कामांचा प्रभाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीही चांगले काम करणाऱया अनेकांना नक्षली ठरवून तुरुंगात टाकण्यात आले. मात्र न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने अनुकूल आला. त्यामुळे यासंदर्भात जनमत करावे लागेल,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी दिली.

पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी होत असल्याचा आरोप मिंधे गटातील मनीषा कायंदे यांनी केला आहे. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ‘पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी झाल्यासंदर्भात दोन संस्थांची नावे पुढे आली आहेत. त्यातील एक लोकायत ही संस्था आहे. या संस्थेकडून अनेक चांगली कामे केली जात आहेत. ही संस्था नक्षली नाही. श्यामसुंदर सोन्नर हे अनेक वर्षांपासून चांगले काम करत आहेत. चांगले काम करणाऱया आणि विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षलींचे शिक्के मारण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होत आहेत,’ असे पवार यांनी सांगितले.