WC 2023 – ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका आज आमने-सामने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीचे प्रबळ दावेदार असलेले ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे दोन संघ उद्या गुरुवार, 12 ऑक्टोबरला भिडणार आहेत. आयसीसी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे संघ अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. त्यामुळे गुरुवारी क्रिकेटप्रेमींना एक तुल्यबळ लढत बघायला मिळणार आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला सलामीच्या लढतीत  हिंदुस्थानने हरवले आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला 102 धावांनी धूळ चारून आपल्या वर्ल्ड कपच्या विजयी अभियानाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या ऑस्ट्रेलियापुढे मनोबल उंचावलेल्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.

पिच रिपोर्ट

लखनौची खेळपट्टी गोलंदाजीसाठी विशेषतः फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. या मंद खेळपट्टीवर फलंदाजांची कसोटी लागणार आहे. या मैदानावर आतापर्यंत केवळ चार वन डे सामने झालेले आहेत. येथे वेस्ट इंडीजने अफगाणिस्तानविरुद्ध केलेली 5 बाद 253 ही आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या होय.

हेड टू हेड

उभय संघात आतापर्यंत 108 वन डे सामने झाले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 50, तर आफ्रिकेने 54 सामने जिंकले आहेत. याचबरोबर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही, तर 3 लढती टाय झालेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने होमग्राऊंडवर 19, तर आफ्रिकेने 28 सामने जिंकलेत. वर्ल्ड कपच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने 3, तर दक्षिण आफ्रिकेने 2 लढती जिंकल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका – क्विंटन डिकॉक, तेम्बा बवुमा (कर्णधार), एडन मार्करम, रॉसी वॅन डर डुसेन, रिझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, मार्को यानसन, गेराल्ड कोएत्झ, लिझाड विलियम्स, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी, कॅगिसो रबाडा.

ऑस्ट्रेलिया – ऍलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), ट्रव्हिस हेड, जोश इंगलिस, स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, सीन ऍबॉट, कॅमरून ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लाबुशेन, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा.

10 – आजची लढाई

ऑस्ट्रेलिया  वि. द.आफ्रिका

वेळ – दु. 2.00 वा.

लाइव्ह – स्टार स्पोर्ट्स, डिज्नी हॉटस्टार