
सामना प्रतिनिधी । दुबई
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पाचव्या व अखेरच्या सामन्यातही 20 धावांनी धुव्वा उडवून एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पाकिस्तानचा 5-0 फरकाने सुपडा साफ केला. अष्टपैलू कामगिरी करणारा ग्लेन मॅक्सवेल सामन्याचा मानकरी ठरला, तर मालिकावीराची माळ ऍरोन फिंचच्या गळ्यात पडली. कांगारूंचा हा सलग आठवा एकदिवसीय विजय होय. हिंदुस्थान दौर्यावरही ऑस्ट्रेलियाने 3-2 फरकाने मालिका जिंकून यश संपादन केले होते.
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 328 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला 7 बाद 307 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. त्यांच्याकडून हॅरिस सोहिलने 130 धावांची खेळी करीत पाकिस्तानच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शान मसूद (50) व कर्णधार इमाद वसीम (नाबाद 50) यांनीही अर्धशतके झळकवली, पण तरीही पाकिस्तानला 20 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेंडॉर्फने सर्वाधिक 3 फलंदाज बाद केले.




























































