
अक्षय कुमारचा आगामी चित्रपट बच्चन पांडेच्या सेटवर आग लागल्याचं वृत्त आहे. चित्रपटातील एका पॅचवर्कचं काम सुरू असताना ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.
चित्रपटाचं चित्रीकरण बऱ्यापैकी पूर्ण झालं असलं तरी काही प्रसंगांना अतिरिक्त जोडणी म्हणून चित्रीत करण्यात येतं. अशा प्रसंगांना पॅचवर्क सीन असं म्हटलं जातं. बच्चन पांडेच्या अशाच एका पॅचवर्कचं चित्रीकरण सुरू होतं. या प्रसंगात अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनन देखील होते.
सेटवर लागलेली आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठा अपघात टळला आहे. या आगीत कुणालाही इजा झालेली नसून फार नुकसान देखील झालेलं नाही, अशी माहिती मिळत आहे.
अक्षय कुमार अभिनित बच्चन पांडे हा Jigarthanda या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. अक्षय या चित्रपटात एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसेल, ज्याला अभिनेता व्हायची इच्छा आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनन ही या चित्रपटात एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांखेरीज अर्शद वारसी देखील बऱ्याच काळाने पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
हा चित्रपट यंदाच्या बिग रिलीज चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झालेला आहे. मार्च 2022मध्ये या चित्रपटाचं प्रदर्शन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापूर्वी अक्षयचा या चित्रपटातील लूक व्हायरल झाला होता. गळ्यात साखळी, रुद्राक्षांची माळ आणि एक डोळा निळ्या रंगाचा अशा अवतारातल्या अक्षयच्या लुकला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
View this post on Instagram


























































