बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चोरांचा ‘दरबार’, 50 लाखांचे दागिने हातोहात लंपास

बागेश्वर बाबा का नाम लेलो तुम्हारा कोई बिगाड नही सकता… ये परचा कभी झूठ नही निकलेगा… असे सांगत धिरेंद्रकृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वरधामच्या कार्यक्रमात आपले नशीब आजमावण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. या कथित दिव्य दरबार कार्यक्रमात बाबा कोणाला पावले हे समजले नाही. पण चोरांचा ‘दरबार’ मात्र चांगलाच गाजला. एकीकडे भव्य मंडपात बाबांची भविष्यवाणी सुरू असताना दुसरीकडे भामटय़ांनी ‘हात की सफाई’ करीत 36 महिलांचे लाखो रुपये किमतीचे दागिने लुटले. गर्दी, चेंगराचेंगरी याचा फायदा उठवत ‘चोर बाबां’नी आपला अनोखा साक्षात्कार या दरबारात केला.

धिरेंद्रबाबांच्या कार्यक्रमाला काँग्रेससह विविध पक्ष तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध करूनही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शनिवारपासून मीरा रोडच्या एस.के. मैदानावर दरबार आयोजित केला. सोशल मीडियावर तसेच प्रसारमाध्यमांमध्ये सतत गाजत असलेला हा बाबा नेमका करतो तरी काय, हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्याचाच फायदा चोरांनी उठवला. या कार्यक्रमामध्ये महिलांची संख्या मोठी होती. शनिवारी एकाच वेळी 36 महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्रे तसेच सोन्याच्या साखळय़ा लंपास करण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही अचानकपणे चोरटे प्रकटले आणि त्यांनी बागेश्वर बाबाच्या समोरच मंगळसूत्रे आणि सोनसाखळय़ा लांबवल्या. अनेक महिलांना वाटले की, आपली परची निघेल व बागेश्वर बाबांची भेट होईल. पण प्रत्यक्षात बाबांऐवजी चोरच प्रगटले आणि हात की सफाई करून ‘अंतर्धान’ही पावले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच महिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. आता या चोरटय़ांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

प्रवेशद्वार उघडले आणि….
मीरा रोडमधील एस.के. मैदानावर भव्य मंडप टाकण्यात आला होता. सकाळपासूनच प्रचंड गर्दी जमली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रवेशद्वार उघडताच महिला वर्गाच्या झुंडीच्या झुंडी आत जाऊ लागल्या. त्यामुळे अचानक मोठा गदारोळ निर्माण झाला. काही जण तर मैदानावर खाली पडले. त्याचाच फायदा उठवत चोरटय़ांनी आपली ‘दिव्य’शक्ती दाखवून मंगळसूत्रे आणि सोनसाखळय़ा लांबवल्या.