
थोरल्या बाजीराव पेशव्यांना सिद्धीवरील मोहीमेत साथ केलेले हवालदार जोशी घराण्यातील पराक्रमी पुरूष सरदार बाजी गोविंद जोशी यांची समाधी समाधी सापडली आहे. पालीजवळील जांभूळपाडा येथे हा ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. इतिहासाचे अभ्यासक संदीप परब यांनी गेली पाच वर्षे संशोधन करुन हे यश मिळविले आहे.
सुधागड तालुक्यातील कुभांरशेत येथील जोशी घराण्याची जमीन, जांभूळपाडा येथील जोशी घराण्याचे वास्तव्य असलेला पुरातन वाडा, आसरे येथील सरदार बाजी गोविंद जोशी यांनी जीर्णोद्धार केलेले श्री विरेश्वर देवालय याबरोबरच सरसगड किल्ला या सर्व सुधागड तालुक्यातील स्थानांचा सरदार बाजी गोविंद जोशी यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी फार उपयोग झाला- संदीप परब, इतिहास अभ्यासक व संशोधक.
संदीप परब यांनी लिहिलेला ‘मौजे जांभूळपाडा येथील सरदार बाजी गोविंद जोशी यांची समाधी एक अभ्यास’ हा शोधनिबंध कोकण इतिहास पत्रिकेच्या या वर्षीच्या एप्रिल ते जून या अंकामध्ये प्रसिद्ध केला आहे. सरदार बाजी गोविंद जोशी यांच्या ऐतिहासिक कारकीर्दीसंदर्भातील माहीती माधवराव पेशव्यांच्या कर्नाटकातील स्वाऱ्या, पेशवे दफ्तर खंड ३७, सवाई माधवराव यांची रोजनिशी खंड 1 व 3, तसेच चित्पावन या ऐतिहासिक साधनातून मिळाली आहे.
जांभूळपाडा येथील समाधीचा कालखंड पाहिला असता सरदार बाजी गोविंद जोशी यांच्या कारकीर्दीबरोबर जुळत आहे. पेशवाईत जांभूळपाडा येथे वास्तव्यास असलेल्या घराण्यांपैकी जोशी यांचेच घराणे मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होते. सरदार बाजी गोविंद जोशी यांना मिळालेली इनाम जमीन, त्यांच्या वंशजांचे जांभूळपाडा येथील वास्तव्य, पेशवाईतील त्यांच्या असण्यासंदर्भातील ऐतिहासिक साधनातील नोंदी या सर्वांचा विचार करता ही समाधी त्यांचीच असल्याचे परब यांनी सिद्ध केले आहे.

































































