भिडेवाड्यातील मुलींच्या पहिल्या शाळेबाबत चुकीचा उल्लेख, ‘बालभारती’च्या तिसरीच्या पाठ्यपुस्तकात गंभीर चूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याच्या चुकीच्या नकाशाचा वाद ताजा असतानाच ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकातील गंभीर चूक समोर आली आहे. थोर समाजसुधारक जोतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. तथापि, ‘बालभारती’ने इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली शाळा’ असा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. चुकीच्या उल्लेखावर विविध संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग-भाग 2’ या पाठ्यपुस्तकात गंभीर चूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारचे ऐतिहासिक दस्तऐवज, स्मारकांवरील नोंदी तसेच विविध संदर्भग्रंथांमध्ये भिडेवाड्यातील शाळेचा उल्लेख ‘देशातील पहिली मुलींची शाळा’ असा करण्यात आलेला आहे. इतिहासप्रेमींनी हाच उल्लेख योग्य असल्याचे म्हटले आहे. तथापि, ‘बालभारती’कडून फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या शाळेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाल्याची संतप्त प्रतिक्रिया विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग-भाग 2’ या पाठ्यपुस्तकातील भिडेवाड्यातील मुलींच्या शाळेबाबतचा चुकीचा उल्लेख तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी ‘बालभारती’च्या संचालिका अनुराधा ओक यांच्याकडे काही संघटनांनी केली आहे. त्यात काही शिक्षकांनी वैयक्तिकरीत्या निवेदन देऊन चूक सुधारण्याची विनंती ‘बालभारती’ला केली आहे.

समिती अभ्यास करणार, ‘बालभारती’चे स्पष्टीकरण

विविध संघटनांच्या आक्षेपाची ‘बालभारती’ने गंभीर दखल घेतली आहे. फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या मुलींच्या शाळेसंबंधी माहितीची पडताळणी करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात आमची समिती सखोल अभ्यास करेल. आपण धनंजय कीर यांच्या पुस्तकातून असा उल्लेख केला आहे. संघटनांचे पत्र समितीपुढे ठेवू. समिती पूर्ण अभ्यासाअंती पुढील कार्यवाही करेल, असे ‘बालभारती’तील इयत्ता तिसरी ते पाचवी इतिहास समितीचे अध्यक्ष
प्रा. डॉ. गणेश राऊत यांनी म्हटले आहे.