बामणी येथील पूल बांधकामास राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातुर ग्रामीण मतदारसंघातील रमजानपुर भाडगाव भातांगळी ते बामणी या रस्त्यावरील बामणी गावाजवळील पूल सन २०१६ मध्ये अतिवृष्टीत वाहुन गेला होता. या पूलाच्या बांधकामाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

पूल वाहुन गेल्यामुळे या भागातील वाहतुक बंद झाली होती. या पूलाचे तातडीने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी आमदार त्र्यंबक भिसे यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री, मंत्रालयीन सचिव ते मुख्यमंत्री यांच्याकडे केली व मंजुरीसाठी सतत पाठपुरावा केला होता.

गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आमदारांनी या पुलाच्या बांधकाम मंजुरी बाबत मागणी केली होती. परंतु मंजुरी बाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न, लक्षवेधी, कपात सुचना आदी आयुधांद्वारे शासनाकडे मागणी लावून धरली. परिणामी मे २०१८ मध्ये सदर कामासाठी शासनाने तत्वत: मान्यता दिल्याबाबत मंत्री दादा भुसे यांनी आमदार त्र्यंबक भिसे यांना कळविले. त्यानंतर आमदार त्र्यंबक भिसे यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे सदर कामांस प्रशासकिय मान्यता देण्याची मागणी केली व विधानसभेत पुनश्च प्रश्न उपस्थित केला. अखेर राज्य शासनाने सदर बामणी पूलाच्या १ कोटी ८७ लक्ष किंमतीच्या कामास मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नाबार्ड अंतर्गत प्रशासकिय मान्यता दिली.