वांद्रे वाहतूक पोलिसांची खाकीतली माणुसकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

वांद्रे वाहतूक चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका रिक्षात एक तरुण पावसात भिजल्यामुळे कुडकुडत बसला होता. कॉन्स्टेबल मेहबूब तांबोळी यांच्या नजरेस तो तरुण पडला. ताबोंळी यांनी जवळ जाऊन त्याची विचारपूस केली. तेव्हा त्या व्यक्तीने त्याचे नाव मारुती बबन शिंदे असे सांगितले.

जालना जिल्हय़ातल्या बारसवाडा गावचा रहिवाशी असून आई-वडिलांचे निधन झाल्यापासून नैराश्याच्या गर्तेत सापडलो आहे. तेव्हापासून मुंबईत भरकटत असल्याचे त्याने सांगितले. दहा दिवस जेवलो नसल्याने ही अवस्था झाल्याचे तो म्हणाला. मारुतीने कैफियत मांडताच तांबोळी यांनी लगेच स्वतःचा डब्बा आणून मारुतीला जेवण दिले. इतकेच नाही तर मारुतीला बरे वाटावे म्हणून त्याला लागलीच रुग्णालयात दाखल केले.