बांगलादेशवर फॉलोऑनचे संकट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘टीम इंडिया’ने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱयाच दिवशी मजबूत पकड मिळविली. पहिल्या डावात 133.5 षटकांत 404 धावसंख्या उभारणाऱया हिंदुस्थानने बांगलादेशची पहिल्या डावात उर्वरित 44 षटकांच्या खेळात 8 बाद 133 अशी दुर्दशा केली. यजमान संघावर सध्या फॉलोऑनचे संकट असून फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना अजूनही 72 धावांची गरज आहे. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा मेहदी हसन 16, तर इबादत हुसैन 13 धावांवर खेळत असून बांगलादेशचा संघ अजूनही 271 धावांनी पिछाडीवर आहे.

रविचंद्रन अश्विनचे अर्धशतक

त्याआधी, गुरुवारी सकाळी हिंदुस्थानने 6 बाद 278 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र श्रेयस अय्यर बुधवारच्या धावसंख्येत दोन धावांनी भर घालून 86 धावांवर बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन (58) व कुलदीप यादव (40)  यांनी सुरेख फलंदाजी केली म्हणून हिंदुस्थानला चारशे धावांचा पल्ला गाठता आला. अश्विनचे हे कारकीर्दीतील 12 वे कसोटी अर्धशतक ठरले. उमेश यादवनेही नाबाद 15 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून तैजुल इस्लाम व मेहदी हसन यांनी 4-4 विकेट घेतल्या, तर इबादत हुसैन व खालिद अहमद यांनी 1-1 विकेट घेतली.

कुलदीप, सिराजची भन्नाट गोलंदाजी

हिंदुस्थानच्या 404 धावांना प्रत्युत्तर देताना बांगलादेशची सुरुवात निराशाजनक झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आघाडीची फळी कापून काढली, तर फिरकीपटू कुलदीप यादवने मधल्या फळीला भगदाड पाडले. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर नजमुल हुसैनला शून्यावर यष्टीमागे पंतकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. मग उमेश यादवने यासिर अलीचा (4) त्रिफळा उडवला. लिटन दास (24) व झाकिर हसन (20) हे सिराजचे बळी ठरले. सिराजने आघाडीची फळी कापून काढल्यानंतर कुलदीप यादवने मधल्या फळीला धक्के देत बांगलादेशच्या फलंदाजीला भगदाड पाडले. कर्णधार शाकिब अल हसन (3), मुशफिकर रहीम (28), नरुल हसन (16) व तैजुल इस्लाम (0) या महत्त्वाच्या फलंदाजांना कुलदीपने चकवले.