
हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाल्याने मैदानाबाहेर गेला आहे. बांगलादेशच्या डावाच्या दुसऱ्याच षटकात स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना झेल घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली. बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार रोहितला सध्या स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या सामन्यात रोहित फलंदाजी करू शकेल की नाही, हे स्कॅन रिपोर्ट नंतरच कळू शकणार आहे.
बीसीसीआयने ट्विटरवर लिहिले की, ‘टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अंगठ्याला दुखापत झाली, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहे आणि सध्या त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. रोहितच्या जागी उपकर्णधार केएल राहुल मैदानावर संघाचे नेतृत्व करणार आहे’.




























































