
बनावट कागदपत्रांच्या आधारे एका सरकारी बँकेच्या 1 कोटी 29 लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी एकाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. परवेझ शाह असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
तक्रारदार हे एका सरकारी बँकेत मुख्य प्रबंधक म्हणून काम करतात. जानेवारी महिन्यात बँकेने एक तक्रार अर्ज महाराष्ट्र सायबर सेलकडे केला होता. त्या अर्जावरून गोरेगाव पोलिसांनी तपास सुरू केला. गोरेगाव येथे एका सरकारी बँकेची शाखा आहे. गेल्या वर्षी बँकेच्या दक्षता पथकाकडे एक माहिती आली. अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून बनावट खाते केले. ओव्हर ड्रफ्ट खात्यातून इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगचा वापर करून 1 कोटी 29 लाख रुपये काढले गेले. फसवणूक झालेली रक्कम ही चांदिवली, मरोळ, पवई येथील एका खासगी बँकेच्या खात्यात जमा झाल्याचे उघड झाले.
हा प्रकार संशयास्पद वाटल्याने बँकेने त्या खात्याची माहिती मागवली. एकाच बँकेने खात्याची माहिती दिली. त्यामुळे बँकेने ज्या खात्यात रक्कम जमा केली होती ती खाती फ्रिज केली. जून महिन्यात बँकेकडे एक केवायसीसाठी अर्ज आला होता. बँकेने त्या खातेधारकाला इंटरनेट बँकिंगची सुविधा दिली होती. केवायसी अपडेट झाल्यावर त्या खात्यातून 91 लाख रुपये काढून विविध खात्यांत टाकले गेले. तसेच बँकेचे अॅप्स वापरून 38 लाख रुपयेदेखील दुसऱया खात्यात वर्ग करण्यात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने बँकेने चौकशी केली. त्या संशयित खातेधारकाचा 2014 मध्ये मृत्यू झाल्याचे उघड झाले. तसेच ते खाते बंद केले गेले नव्हते. त्या खात्यात व्याज जमा होत होते. या घटनेनंतर बँकेने चौकशी सुरू केली. बँक प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला. फसवणूकप्रकरणी बँकेने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला. उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय थोपटे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सुदर्शन पाटील आणि पथकाने तपास सुरू केला. फसवणुकीचे पैसे ज्या खात्यात जमा झाले, त्याची माहिती पोलिसांनी काढली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परवेझला कुर्ला येथून ताब्यात घेऊन अटक केली.






























































