
सोलापूर जिल्हा व साखर कारखानदारीचा सर्वांत मोठा जिल्हा असून, शेतकऱयांना संगनमताने नागविणारी टोळी गेल्या काही वर्षांपासून सक्रिय आहे. बँकेत खाते नसताना कारखान्याच्या शिफारशीवरून परस्पर कर्ज उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवानंद भीमशा गोविंद या शेतकऱयाने बँक व कारखान्याने दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार वळसंग पोलीस ठाण्यात केली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी येथे राहणारे शिवानंद गोविंद यांच्या नावावर बँक ऑफ बडोदा शाखा रेल्वेलाइन सोलापूर येथून शेतात ट्रिप करण्याच्या नावाखाली दोन लाख रुपये मंजूर करून ही रक्कम परस्पर गोकुळ साखर कारखाना धोगी (ता. दक्षिण सोलापूर) यांना दिली. या बँकेत गोविंद यांचे खाते नाही, कर्जाची मागणी केली नाही, जामीनदार दिला नाही, तरीही बँक ऑफ बडोदाने परस्पर कर्ज मंजूर करून गोकुळ साखर कारखान्याला 2017मध्ये रक्कम दिली.
या कर्जाच्या थकबाकीबाबत बँकेने 2020मध्ये गोविंद यांना नोटीस पाठवून थकीत कर्जाची रक्कम न भरल्यास कारवाईचा इशारा दिला होता. याबाबत बँकेकडे व कारखान्याकडे वारंवार विचारणा करूनही माहिती दिली जात नाही. त्यामुळे गोविंद यांनी बनावट कागदपत्रे, स्वाक्षरीच्या आधारे बँक व कारखान्याने फसवणूक केल्याची तक्रार वळसंग पोलीस ठाण्यात केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनलगे तपास करीत आहेत. बँक व साखर कारखान्यांनी शेतकऱयांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून शेकडो शेतकऱयांची फसवणूक केल्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे.


























































