
बारसूत रिफायनरी प्रकल्प उभारता येणार नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी ‘युनेस्को’ या जागतिक वारसा स्थळांचे संवर्धन करणाऱ्या संस्थेचा दाखला दिला.
रत्नागिरीतील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, बारसूमध्ये कातळशिल्प सापडली आहेत. ‘युनेस्को’ नावाची एक मोठी संस्था आहे. या संस्थेचे जगभरातल्या 192 देशांबरोबर करार आहेत. यात हिंदुस्थानचादेखील समावेश आहे. हिंदुस्थाननेदेखील त्यांच्याबरोबर करार केलेला आहे. ‘युनेस्को’अंतर्गत येणाऱ्या अजिंठा-वेरूळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा अनेक वास्तू आहेत. या वास्तू ‘युनेस्को’च्या अखत्यारित येतात. ही संस्था ठरवते की, या वास्तूंच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची विकासकामे होणार की नाही, जिथे या प्रकारच्या हजारो वर्षे जुन्या वास्तू असतात त्यांच्या आजूबाजूला तुम्हाला विकासकामे करता येत नाहीत. बारसूमध्ये जी कातळशिल्प आहेत त्याला ‘बफर एरिया’ म्हटले जाते. तो काही किलोमीटरचा असतो. त्या भागात तुम्हाला कोणत्याही प्रकारची विकासकामे करता येत नाहीत. एखाद्या ठिकाणी असा जर काही भाग असेल तर त्याच्या तीन किलोमीटरच्या परिसरात काहीही करता येत नाही, असे ते म्हणाले.

























































