
सध्या थंडीचा मोसम असल्याने गरम पाण्याने आंघोळ करण्याची एक वेगळीच मजा असते. गारेगार वातावरणात गरम पाण्याचा स्पर्श शरीराला सुखावतो. त्यामुळे इतर मोसमात सहसा लवकर आटोपणारी आंघोळ या काळात जास्त वेळ सुरू राहते. पण, 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ आंघोळ केल्यास त्याचा शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं.
आंघोळ करण्यासाठी जास्तीत जास्त 15 मिनिटांचा अवधी पुष्कळ असतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आंघोळ करताना आपण अनेक चुकीच्या गोष्टी करतो. त्याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. त्यामुळे आपल्या त्वचेला आणि केसांना हानी पोहोचते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, साबण आणि शाम्पूचा वापर प्रमाणापेक्षा जास्त वेळ त्वचेवर राहणं योग्य नसतं. त्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते. ती कोरडी होऊ लागते. त्यामुळे साबण किंवा शाम्पूच्या वापरानंतर पाण्याने नीट धुणं गरजेचं असतं. अन्यथा त्वचेला भेगा पडू शकतात.
तसंच अनेक जण शॉवरच्या खाली उभं राहून बराच वेळ आंघोळ करतात. अशी सवयही चुकीची असल्याचं तज्ज्ञ सांगतात. 15 मिनिटांपेक्षा अधिक काळ शॉवर खाली उभं राहणं त्वचेवर विशेषतः केसांच्या त्वचेवर परिणाम करू शकतं.
अधिक काळ आंघोळ केल्याने त्वचेला भेगा पडू शकतात. त्यातून अनेक विषाणू शरीरात जाऊ शकतात. तसंच, साबण जरी शरीरावरील विषाणू मारतो, तरी त्याचा अधिक वेळ वापर हा शरीरावरील उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या संतुलनालाही बिघडवतो आणि त्वचेवर अनुकूल नसलेल्या सूक्ष्म जीवांच्या वाढीला खतपाणी घालतो.
ज्या पाण्याने आपण आंघोळ करतो, त्यातही क्षारता, जड धातू, क्लोरिन, फ्लुरॉईड, पेस्टीसाईड्स आणि अन्य काही रसायनं असतात. त्यामुळे त्यांचाही धोका आपल्याला असतो.




























































