
पुणे शहरानजीक बावधनमधील बिग बास्केटच्या गोदामाला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. सुमारे 25 हजार स्क्वेअर फुट असलेले हे पत्र्याचे संपूर्ण गोदाम या आगीमुळे पूर्णपणे नष्ट झाले आहे. आगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाले. पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए व एमआयडीसी येथील एकूण 12 फायरगाड्या व वॉटर टँकरच्या सहाय्याने ही आग विझविण्यात यश आले. आग लागताच गोदामातील सर्व जण बाहेर आल्याने कोणीही जखमी झाले नाही.
अग्निशमन दलाचे अधिकारी मेमाणे यांनी सांगितले की, बावधन बुद्रुक येथे नागरिकांना घरपोच भाजीपाला, धान्य, किराणा पोहचविणाऱ्या बिग बास्केट या कंपनीचे सुमारे 25 हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम आहे. हे गोदाम संपूर्णपणे पत्र्यांचे शेड असून त्याला सुमारे 12 ते 13 शटर होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजता या गोदामाला आग लागली.
गोदामाला लागूनच मालाची वाहतूक करणारी वाहने व दुचाकी पार्क केल्या होत्या. त्यांनाही या आगीची झळ बसून ती वाहने पेटवून खाक झाली. अग्निशमन दलाला रात्री 11 वाजून 34 मिनिटांनी आगीची खबर मिळाली. आग इतकी भीषण होती की, त्यात पत्र्याच्या शेडला लावलेले लोखंडी अँगलही वाकले. त्यामुळे आत जाणे धोकादायक बनले होते. पत्रे अस्तावस्त पडल्याने आगीपर्यंत पाणी पोहचत नव्हते. गावातील 2 जेसीबीच्या सहाय्याने पत्रे बाजूला करुन ही आग विझविण्यात आली.
जवानांमुळे तिजोरीतील 8 लाख वाचविले
आग विझवित असतानाच तेथील व्यवस्थापकाने तिजोरी असून त्यात पैसे असल्याचे सांगितले. तेव्हा अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी यांनी आत प्रवेश करुन तिजोरी बाहेर आणली. त्यातील 8 लाख रुपये वाचविण्यात यश आले. मात्र, तिजोरी जवळील टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये जळून खाक झाले.




























































