
दक्षिण आफ्रिकन दौऱयात सीनियर टीम इंडियाचा फ्लॉप शो सुरू असताना वेस्ट इंडीजमधील अंडर 19 विश्वचषकामध्ये हिंदुस्थानी युवा संघ दमदार प्रदर्शन करीत आहे. युवा संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या परिस्थितीतही विजयासाठी जीव तोडून कामगिरी करणाऱया हिंदुस्थानी युवा संघाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ठरवले आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्याआधी हिंदुस्थानचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. स्पर्धेच्या पुढील सामन्यांमध्ये अडचण येऊ नये यासाठी बीसीसीआयने राखीव ठेवलेले उर्वरीत पाच खेळाडू वेस्ट इंडीजला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने उध्यम सहारन, यष्टिरक्षक फलंदाज अभिषेक पोरेल, रिथीश रेड्डी, अंश गोसाई आणि पीएम सिंह राठोड यांना वेस्ट इंडीजला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या वेस्टे इंडीजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 विश्व चषकासाठी हिंदुस्थानने 17 सदस्यांचा संघ पाठवला होता. मात्र त्यातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे हिंदुस्थानी संघापुढील अडचणी वाढल्या होत्या. हिंदुस्थानने उर्वरीत 11 खेळाडूंना आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरवला होता. हिंदुस्थानी संघ ग्रुप बीमध्ये असून सुरुवातीचे दोन्ही सामने हिंदुस्थानने जिंकले आहेत. हिंदुस्थानचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. हिंदुस्थानचा तिसरा सामना युगांडाविरुद्ध होणार आहे. या सामन्यातही हिंदुस्थान आयर्लंडविरुद्ध खेळवलेल्या 11 खेळाडूंना घेऊन उतरणार आहे. हिंदुस्थानी युवा संघाची अंडर 19 विश्वचषकातील आतापर्यंतची कामगिरी नेत्रदीपक झाली आहे. त्यामुळे यंदा पुन्हा युवा टीम इंडिया जेतेपदासाठी फेवरीट मनाली जात आहे. कोरोनाचीही तमा न बाळगता यश मिळवणाऱया हिंदुस्थानच्या युवा खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
बाद फेरीच्या लढतींत अडचणी येऊ नयेत म्हणून
ग्रुप स्टेजनंतर बाद फेरीचे सामने सुरू होणार आहेत. या बाद फेरीच्या सामन्यात हिंदुस्थानच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे अडचणीवर मात करण्यासाठी पाच खेळाडूंना वेस्ट इंडीजला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.





























































