
जेव्हा ‘बी पॉझिटव्ह’ या स्तंभाविषयी मला विचारण्यात आले तेव्हा एका क्षणाचाही विचार न करता मला मनात माझ्या आईची आई मंदाकिनी गुप्ते हिचेच नाव डोळ्यासमोर आले. … सांगताहेत अभिनेता रणजित जोग.
आजीला आम्ही ‘मोठी आई’ असं म्हणायचो. नातेवाईकांची, मित्रमंडळींची, लहानमोठय़ांची… साऱयांची ती मोठी आई लाडकी. इतका सकारात्मक विचार करायची की, तिची पॉझिटिव्हिटी पाहून आम्ही सारे अचंबित व्हायचो. कितीही मोठं संकट आलं तरीही डगमगून न जाता ती आम्हाला धीर द्यायची. ‘‘काही नाही रे, होईल सगळे व्यवस्थित…’’ तिचे ते सकारात्मक शब्द आणि आश्वासक नजर मग आम्हा साऱयांना जगण्याचे आणि झगडण्याचे बळ देऊन जायची. ती नेहमी कामातच असायची. पहाटे उठल्यापासून रात्री निजानिज होईपर्यंत सतत काम, काम आणि काम! ती सुंदर कविता लिहायची. तिचं ‘भावस्पर्श’ नावाचं कवितेचं पुस्तकसुद्धा प्रकाशित झालं आहे. तिची स्वतःची एक छोटी नाटय़ संस्था होती. तिने राज्यस्तरीय नाटपंसुद्धा बसवली आहेत. आजोबा वारले तेव्हा न डगमगता मोठय़ा जिद्दीने आमची शेतीवाडी सांभाळून तिने स्वतःच्या मुलींना शिकवलं, मोठं केलं, लग्न करून दिलं… तिला सलाम !
माझे शिक्षण, राहणार नागपूरच, पण जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा मुंबईत एकटाच राहायचो. तेव्हा आजी खास माझ्यासाठी माझ्या काळजीपोटी सहा महिने माझ्याकडे मुंबईमध्ये राहायला आली. सहा महिन्यांत ‘आजी’ नावाच्या विद्यापीठातून मी असंख्य धडे गिरवले, जे मला आजही कामाला येत आहेत. गीतेमधून जे सांगितले की, कर्म करत रहा. फळाची अपेक्षा करत राहू नका. तेच तिच्या जीवनाचं सार होतं. ती आम्हाला नेहमीच सांगायची, नेहमी जमेल तितकी, जमेल तशी दुसऱयाला मदत करत रहा आणि फळाची अपेक्षा अजिबात ठेवू नका. जे काही काम कराल त्याच्यावर प्रचंड प्रेम करा, निष्ठा करा. हे तिचं जगण्याचं सत्त्व होतं आणि तेच ती आमच्यामध्ये सतत बिंबवत राहिली.
तिच्या हाताला चव होती. मटन तर असं अफलातून बनवायची की, बस्स! स्वतः रांधणं आणि दुसऱयांना खाऊ घालणं हे तिच्याकडूनच शिकावं. तिची सारी कामं आटपून ती देवधर्म करायला बसायची. त्यातही जर कोणाला काही हवे असेल तर हातातली पोथी बाजूला ठेवून ती आपल्या माणसांसाठी धावून जाई. वयाप्रमाणे गुडघे दुखायला लागले आणि ऑपरेशन करणे भाग झाले. त्यालाही तयार नव्हती, पण तिच्या नातीचं लग्न जवळ आहे आणि त्या लग्नात तिला डान्स करायचा होता म्हणून जिद्दीने ती ऑपरेशनसाठीसुद्धा तयार झाली. बीपी, डायबेटिस, कुठलाही आजार नसलेली मोठी आई शेवट शेवटपर्यंत अक्रोडसुद्धा दातांनी पह्डायची. स्वतःचा फिटनेस कसा जपावा हे शिकावं तिच्याकडूनच.
एक गमतीची गोष्ट म्हणजे जरा काही दुखलं की, ताबडतोब क्रोसिन मात्र आवडीने घ्यायची.
आता तीन वर्षांपूर्वीच मावशीकडे असताना मुलानातवंडांसोबत छान खेळली आणि मध्यरात्री दीड वाजता साधा ठसका लागल्याचं निमित्त आणि अटॅक…ती आम्हाला सोडून गेली, पण जाता जाता संस्कारांचं दान आम्हाला देऊन दिली. एक चांगलं माणूस कसं बनावं याची शिकवण देऊन गेली.
आज मोठी आई आमच्यासोबत शरीराने नसली तरी मनाच्या ओंजळीमधील आठवणींच्या अल्बममध्ये ती कायम जिवंत आहे आणि
राहील हे नक्की !
शब्दांकन : निनाद पाटील



























































