
माजलगाव प्रतिनिधी। बीड
सध्या तापमानात दररोजच वाढ होत असून पाण्याअभावी बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण कोरडे ठाक पडले असून नदी नालेही आटले आहेत. मृतसाठ्यातून बाष्पीभवन व पाणीवापर यामुळे दररोज 0.40 दशलक्ष घनमीटर पाणीपातळी घटत असून अवघा साठ दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे .तर पाणी संपत आल्याने माजलगांव धरणाच्या निर्मितीमध्ये गेलेली गावे, मंदिरे यांचे अवशेषही दिसू लागले आहेत.
मराठवाड्यातील जायकवाडीच्या दुसरा टप्पा असलेल्या माजलगांव धरणाच्या निर्मितीसाठी कित्येक गावे, हजारो हेक्टर शेतजमिनी पाण्यात गेल्या. तालुका सुजलाम् सुफलाम् झाला. सिंचनाचे क्षेत्र सत्तर टक्यावर गेले. मात्र गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे माजलगांव धरणामध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याने मृत साठ्यातील पाणीसाठ्यावरच माजलगांव शहर, बीड शहर व अकरा खेड्यांसह बॅकवॉटर वरील अनेक गावांची तहान भागविली जाते, दररोज तापमानामध्ये होत असलेल्या वाढीमध्ये पाण्याचे 0.250 दशलक्ष घनमीटर बाष्पीभवन होत असल्याने धरणातील आहे त्या मृत साठ्यातून होत असलेला बेसुमार उपसा व ४४-४६ अंश तापमानात होणारे बाष्पीभवन यामुळे धरणात अल्प पाणीसाठा आहे, येत्या जुलै महिन्यापर्यंतच पाणी पुरवठा होऊ शकेल असा प्रशासनाचा अंदाज असल्याने बीड-माजलगाव – बीड शहरावर पाणीसंकट ओढवण्याची भीती आहे.
धरणाच्या निर्मितीसाठी अनेक गावच्या गावे, मंदिरे, प्रार्थना स्थळ, शेतजमिनी या पाण्यात गेल्या होत्या ,या भीषण दुष्काळात पाणी झपाट्याने संपल्याने ही गावे, मंदिरांचे अवशेष दिसू लागले आहेत. यावरून दुष्काळाची दाहकता गंभीर असल्याचे दिसून येत आहे.
उसाचे क्षेञ झाले तिपटीने कमी– माजलगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील उसाच्या क्षेञात तिप्पटीने घट झाली असल्याने पुढील वर्षी कारखानदारांना उस मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
































































