
कोरोना काळात लोक आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. व्यायाम करून तंदुरुस्त कसे राहता येईल, याकडे लक्ष देऊ लागले आहेत. याबाबत बीडच्या एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने अनोखा आदर्श घालून दिला आहे. 94 वर्षांचे श्रीराम वाघमारे आजोबा या वयातही सायकल प्रवास करून फिटनेसचा मंत्र देत आहेत. ज्या वयात कुणाच्या आधाराशिवाय घराबाहेर पडता येत नाही, त्या वयात सायकलवर पॅडल मारून पळणारे आजोबा बघून थक्क व्हायला होतं.
श्रीराम वाघमारे मूळचे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिखल बीड गावचे. सध्या ते वडवणी शहरात वास्तव्याला आहेत. जेव्हा ते सायकल प्रवास करताना दिसतात, तेव्हा नागरिक कुतूहलाने त्यांच्याकडे बघतात. प्रकृती ठणठणीत ठेवण्यासाठी सायकल चालवा असा संदेश जणू ते देतात.
वाघमारे आजोबा सांगतात, मी आज 94 वर्षांचा आहे. जेव्हा मी सेवानिवृत्त झालो तेव्हा आवडीचे वाहन म्हणून सायकल घेतली. या वयातही माझी दैनंदिन कामे मी सायकलवरून प्रवास करून करतो. त्यामुळे माझी प्रकृती तंदुरुस्त राहण्यास मदत होते.
































































