बीड हादरलं! शेतीच्या वादातून पुतण्याने कोयत्याने कापले; चुलता जागीच ठार, चुलतीसह तिघे गंभीर

बीड जिल्ह्यातील पिंपरखेड येथे चुलत्याने पुतण्यावर सपासप वार केल्याची घटना ताजी असतानाच आज मांजरसुंबा येथून जवळ असलेल्या मुळूकवाडी येथे आज पहाटे शेतीच्या वादातून महाभारत घडले. वृद्ध चुलता-चुलती पुढे धावत होती, तर हातात कोयता घेऊन पुतण्या त्यांचा पाठलाग करत होता. अखेर पुतण्याने वृद्ध चुलता-चुलतीला गाठले आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यात चुलत्याचा जागीच मृत्यू झाला, तर चुलतीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तसेच या घटनेत अन्य दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोर पुतण्याला ताब्यात घेतले आहे.

बीड तालुक्यातील मांजरसुबा जवळ असलेल्या मुळूकवाडी येथील निर्मल कुटुंबात शेतीवरून जुना वाद सुरू होता. शेतीच्या या वादाने आज भल्या पहाटे थरार नाट्य घडले. पुतण्या रोहिदास विठ्ठल निर्मल (वय – 50) याने आपले चुलते बळीराम मसाजी निर्मल (वय – 80) आणि चुलती केसरबाई बळीराम निर्मल (वय – 70) यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले.

कोयत्याच्या वाराने रक्तबंबाळ झालेल्या चुलत्याचा जागीच मृत्यू झाला, तर चुलती केसरबाई गंभीर जखमी झाली. या हल्ल्यात चुलतभाऊ चोखोबा निर्मल, कांताबाई हिराजी निर्मल या ही जखमी झाल्या आहेत. यातील केसरबाई निर्मल यांना तातडीने पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे, तर इतर दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती कळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर पुतण्या रोहिदास यास ताब्यात घेतले आहे. मयत बळीराम निर्मल यांचे दोन मुले नोकरीसाठी बाहेरगावी असतात त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेने मुलुकवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.