बीड जिल्ह्यातील 279 शिक्षकांना दिलासा, जिल्ह्यात कार्यमुक्ततेच्या आदेशास स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

सदोष बिंदूनामावलीचा आधार घेत बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 279 शिक्षकांना त्यांच्या मुळ जिल्ह्यात कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध शिक्षकांनी दाद मागितली होती. या निर्णयामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास विभागाचे सचिवांसोबत शिक्षक प्रतिनिधींची तातडीने बैठक घेवून बदली आदेशास स्थगिती दिली होती.

ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवून त्या 279 शिक्षकांना बीड जिल्हा परिषेतून कार्यमुक्त करू नये, असे स्पष्ट आदेशच दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेवून आणि शिक्षकांअभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी सध्या तरी या पदावर संबंधित शिक्षकांना कार्यरत ठेवण्यात यावे असेही त्यात नमुद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जिल्हयातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून शिक्षकांनी या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत.