खेळापूर्वी…आणि नंतर…

बाळ तोरसकर,baltoraskar@gmail.com

खेळ कोणताही असो… त्यामध्ये तंत्रशुद्धच असणे फार गरचेचे असते….

खो-खोची ओळख आपण मागे करून घेतलीच आहे. या खेळात असलेले विलक्षण चापल्य, वेगवान निर्णय, साहसी झेप किंवा अप्रतिमरीत्या स्तंभात मारणे, खेळाडूंच्या हुलकावण्या यामुळे ७ किंवा ९ मी. व त्याचबरोबर संपूर्ण सामना नेहमीच रोमहर्षक ठरत असतो. खो-खोतील हे चापल्य व केले जाणारे इतर व्यायाम मात्र खेळाडूंना आयुष्यभर तंदुरुस्त ठेवतात. अतिशय वेगवान, क्षणाक्षणाला उत्कंठा व निर्णय क्षमता वाढवणारा हा खेळ प्रेक्षकांना नेहमीच मैदानावर खिळून ठेवतो. खो-खो हा वेगवान, साहसी खेळ असल्याने त्यात खेळाडूंच्या दुखापतीसुद्धा खूप आहेत. त्यांची योग्य व वेळेत काळजी घेतली नाही तर आपल्या शरीराची दुखापत बळावण्याची शक्यताच जास्त असते.

खो-खो खेळाचा विचार केला तर प्रत्येक खेळाडूने नियमित सरावाबरोबर सरावाआधी बॉडी वॉर्मअप व सरावानंतर बॉडी कंडिशनिंग करणे फारच महत्त्वाचे आहे. कोणताही खेळ असो शरीर लवचिक असणे फारच महत्त्वाचे आहे. जर आपण सराव करत असू किंवा प्रत्यक्ष सामना खेळत असू तरी बॉडी वॉर्मअपला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या डोक्यापासून पायाच्या अंगठय़ापर्यंत प्रशिक्षकाने दिलेले वेगवेगळे व्यायाम प्रकार करून खेळाडूने आपले शारीरिक तापमान वाढवले पाहिजे व त्याचबरोबर सराव किंवा सामना संपल्यावरसुद्धा प्रशिक्षकाने दिलेले वेगवेगळे व्यायाम प्रकार करून बॉडी कंडिशनिंग म्हणजे शारीरिक तापमान कमी केले पाहिजे / शरीर थंड केले पाहिजे.

khel-1

शारीरिक तापमान वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार असतात. त्यात हळू धावणे (जॉगिंग करणे), शॉर्ट स्प्रिंट, लाँग स्प्रिंट मारणे फारच योग्य ठरते. त्याचबरोबर वेगवेगळे व्यायाम प्रकार म्हणजेच मानेचा, हातांचा, कंबरेचा, गुडघ्याचा, घोटय़ाचा असे विविध प्रकारचे व्यायाम प्रकार प्रशिक्षक करून घेत असतात व त्यामुळेच आपले शारीरिक तापन योग्य झाल्याने खेळात आपण प्रचंड वेगवानता, लवचिकता व चापल्य दाखवू शकतो. सामना / सराव संपल्यावरसुद्धा लगेच पॅकअप न करता बॉडी कंडिशनिंग करणे फारच म्हत्त्वाचे आहे. याचा अर्थ लगेच थंड पाण्याने आंघोळ करावी किंवा एसीत बसावे असे नाही. तर आपण प्रशिक्षकाने दिलेले वेगवेगळे व्यायाम प्रकार करून आपले शरीर थंड केले पाहिजे. त्यावेळी आपल्या शिरा हळू हळू ताणल्या जाण्याचा व शरीर लवचिक व थंड करण्याचा व्यायाम आपण करणे महत्त्वाचे आहे. जर शरीराला तापन व शीतल करण्याचा नीट व्यायाम केला नाही तर मात्र आपल्या शरीराची हानी मात्र नक्कीच ठरलेली असेल हे समजा.

आपले शरीर जेवढे लवचिक तेवढी चपळता जास्त टिकाऊ असते. जसे वादळात झाडे उन्मळून पडतात, परंतु लव्हाळे टिकून राहतात. तसे शरीराला तापन व शीतलतेची गरज असते तशीच शरीराला योगा व प्राणायामची जोडसुद्धा खूप गरजेची असते. त्यासाठी प्राणायाम व सूर्यनमस्कार खूप मदत करतात. शॉर्ट स्प्रिंटसाठी बटाटा शर्यत किंवा छोटे-छोटे रणअप हे एक खो मिळाल्यापासून दुसरा खो देईपर्यंत करावी लागणारी जोरदार शॉर्ट स्प्रिंटसाठी उपयोगी पडते. हे सर्व टिकवून ठेवताना आपल्याला काही काळजी घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे.

शारीरिक दुखापतींच्या बाबतीत विचार केला तर मात्र व्यायामाला खूपच महत्त्व द्यावे लागेल. जर वॉर्मअप शिवाय खो-खोचा सराव केला तर मात्र खेळाडूला धावताना, खुंट मारताना, सूर मारताना वेगवेगळ्या दुखापती होऊ शकतात. यात प्रामुख्याने खांद्याच्या, हाताच्या, पाठीच्या, कंबरेच्या, गुडघ्याच्या व घोटय़ाच्या दुखापती प्रमुख आहेत. त्या कशा थांबवाव्यात अथवा त्यापासून सुटका कशी करावी याचा विचार केला तर मात्र सरावाआधी बॉडी वॉर्मअप व सरावानंतर बॉडी कंडिशनिंग याला पर्याय नाही.

जर खेळताना दुखापत झाली तर मात्र पुन्हा खेळण्यापूर्वी प्रथमोपचार फारच महत्त्वाचा आहे. शिवाय त्यानंतर करावा लागणारा रिहॅबिलेशन प्रोग्रामला महत्त्व द्यावे लागेल. त्यासाठी जंक फूडला फाटा देऊन पौष्टिक आहाराला प्रथम प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याचे फिजियोथेरेपिस्ट डॉ. गाडगीळ यांनी सांगितले. प्रत्येक दुखापतीनंतर आराम घेणे व त्यासाठी रिहॅबिलेशन प्रोग्राम करणे ही काळाची गरज असल्याचेही सांगितले. जर आपण चालायचे व्यायाम करत असाल तर नेहमी एकाच प्रकारच्या सरफेसवर न चालता कधी मातीत तर कधी गवतावर, कधी रोडवर तर कधी वाळूवर चालल्याने पायाच्या विविध इजा दूर होऊ शकतात. त्याचबरोबर पहाटेच्या वेळी सूर्योदयाआधी व नंतर दोन-दोन असे चार तास या कालावधीत चालल्याने भरपूर ऑक्सिजन व त्याचबरोबर या कालावधीत प्रदूषण कमी असल्याने शुद्ध वातावरणाचा फायदा आपल्या शरीराला मिळेल. खेळाडूंना यशस्वी व्हायचे असेल तर हे मात्र नक्कीच करावे लागेल.